अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आलेल्या मराठी भाषिक गावांचा महाराष्ट्रात समावेश करावा, या मागणीसाठी दरवर्षीप्रमाणे मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 19 डिसेंबर 2022 रोजी बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. याची आपण नोंद घेऊन आवश्यक व्यवस्था करावी. तसेच महामेळाव्याला परवानगी द्यावी, अशी विनंती मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्त यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील आदींनी महामेळाव्यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त व मनपा आयुक्त यांच्या नावे नुकतेच सादर केले आहे. कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह 865 मराठी भाषेत गावांचा महाराष्ट्रात समावेश करावा या मागणीसाठी त्या गावातील लोक गेल्या 1956 पासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. गेल्या 2004 पासून महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि आम्ही न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करत आहोत.
कर्नाटक सरकारला सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका बाजू ठामपणे मांडणे कठीण जात आहे. वादग्रस्त सीमाभागावर कर्नाटक सरकार बेकायदेशीररित्या आपला ताबा दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. हे सरकार येथील मराठी भाषिकांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बेळगावमध्ये हिवाळी विधिमंडळ अधिवेशन भरवत आहे. त्यामुळे सीमा भागातील मराठी जनतेची मराठी भाषिक राज्यात सामील होण्याची तीव्र इच्छा लोकशाही मार्गाने प्रकट करण्यासाठी मराठी भाषिकांकडून दरवर्षी बेळगावमध्ये सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या समांतर मराठी भाषिकांचे अधिवेशन (महामेळावा) आयोजित केले जाते.
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा महामेळावा होतो. त्यानुसार यंदा येत्या सोमवार दि. 19 डिसेंबर 2022 रोजी आम्ही हा मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करत आहोत. तेंव्हा कृपया याची नोंद घेऊन आवश्यक व्यवस्था करावी. या मेळाव्याला हजर राहण्यासाठी त्या दिवशी सकाळी 11 ते 4 या वेळेत महाराष्ट्रातील नेतेमंडळीही येण्याची शक्यता आहे, अशा आशयाचा तपशील मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
जिल्हाधिकारी व बेळगाव पोलीस आयुक्तांना हे निवेदन देण्यात आले असून महापालिका आयुक्तांकडे टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत महामेळावा आयोजित करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सीमाभागावरील आपले वर्चस्व दाखवण्यासाठी कर्नाटक सरकारकडून गेल्या 2006 सालापासून बेळगावमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविले जात आहे. प्रारंभीच्या काळात हे अधिवेशन जेएनएमसीच्या सभागृहात आयोजित केले जात होते. त्या वेळेपासूनच म्हणजे 2006 सालापासून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सरकारच्या अधिवेशनाला समांतर अशा मराठी भाषिकांच्या विराट महामेळाव्याचे व्हॅक्सिन डेपो मैदानावर आयोजन केले जाते.
मध्यंतरी कर्नाटक सरकारने आपला मराठी द्वेष प्रकट करताना 2019 आणि 2012 मध्ये या महामेळाव्यावर बंदी घातली होती. त्यावेळी मेळाव्याच्या ठिकाणी जाणारे सर्व मार्ग बंद करून मोठी दडपशाही करण्यात आली होती. मात्र तरीही सरकारचा हुकूम मोडून मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा यशस्वी केला होता. आता येत्या 19 डिसेंबर रोजी आयोजित महामेळाव्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली असून हा मेळावा देखील कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करण्याचा निर्धार समिती नेत्यांनी केला आहे.