साहित्यप्रेमींचा आनंदाचा उत्सव म्हणजे साहित्य संमेलने! सीमाभागात विविध ठिकाणी भरविण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनात साहित्यप्रेमींना भरभरून साहित्याची मेजवानी मिळते. मात्र कोविड परिस्थितीमुळे गेल्या २ वर्षात साहित्य संमेलने भरविण्यात आली नव्हती. आता सर्व निर्बंध हटविण्यात आले असून यंदा सीमाभागात पुन्हा दमदार साहित्य संमेलनाने भरविण्यात येणार आहेत.
कारदगा, बेळगुंदी, माचीगड, कडोली, उचगाव, येळ्ळूर, कुद्रेमानी, निलजी, सांबरा, बेळगाव आदी ठिकाणी विविध दिग्गज साहित्यिक-मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलने भरविण्यात येतात.
यापैकी पहिल्या टप्प्यातील बहुतांशी साहित्य संघांनी संमेलनांचे नियोजन जाहीर केले असून अद्याप काही संमेलनांच्या तारखा जाहीर होणे बाकी आहे.
भव्य साहित्य संमेलन, साहित्य संमेलनातील विविध सत्र, वनभोजन, ग्रंथदिंडी अशा स्वरूपाची साहित्य संमेलने गेल्या दोन वर्षात कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे गावपातळीवर भरविण्यात आली होती. मात्र यंदा कोविडचे सावट दूर झाल्याने जय्यत तयारीसाठी साहित्य संघांची लगबग सुरु झाली आहे.
विविध १२ ठिकाणी भरविण्यात येणाऱ्या संमेलनांपैकी बेळगुंदी, माचीगड, कडोली, उचगाव, बेळगाव या संमेलनांच्या तारखा ठरल्या असून कुद्रेमानी, निलजी, सांबरा, येळ्ळूर येथील साहित्य संमेलनांच्या तारखा अद्याप जाहीर होणे बाकी आहे.
२७ नोव्हेंबर रोजी कारदगा येथे यंदाचे पहिले साहित्य संमेलन भरविण्यात येणार असून साहित्यिकांच्या गाठीभेटी, देणगीदार आणि साहित्यसंमेलनाच्या तयारीसाठी संमेलन संयोजकांनी धावपळ सुरु झाली आहे.