कर्नाटक स्टेट को-ऑप. अर्बन बँक फेडरेशन बेंगलोर यांच्यावतीने सहकार सप्ताहानिमित्त शहरातील मराठा को-ऑप. बँकेला ‘उत्कृष्ट सहकारी बँक’ हा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.
ऑटोनगर, बेळगाव येथील एच. के. पाटील सभागृहामध्ये आयोजित सहकार सप्ताहाचे औचित्य साधून सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते उत्कृष्ट सहकारी बँक हा पुरस्कार मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार व संचालक बाळासाहेब काकतकर यांनी स्वीकारला.यावेळी मराठा बँक संचालक हंडे उपस्थित होते.
याप्रसंगी फेडरेशनचे जगदीश कवटगीमठ, खासदार इराण्णा कडाडी, फेडरेशन संचालक डी. टी. पाटील, उपाध्यक्ष परमेश्वर, किशोर भडगावी आदी उपस्थित होते. उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार मिळाल्याबद्दल सहकार क्षेत्रासह सर्वत्र मराठा बँकेच्या संचालक मंडळाचे अभिनंदन होत आहे.
बेळगावमध्ये सहकार सप्ताहाचे आयोजन
बेळगाव : कर्नाटक राज्य सहकारी महामंडळ, कर्नाटक राज्य सहकारी अर्बन बँक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावमध्ये ६९ व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑटोनगर येथील कर्नाटक राज्य सहकारी शहर कार्यालयाच्या के. एच. पाटील सभागृहात आयोजिण्यात आलेल्या या कार्यक्रमात सहकारी संस्थांचा विकास, पुनर्र्चना, त्यांच्यासमोरील आव्हाने आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी बोलताना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी, औषध, शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा यासह इतर क्षेत्रात सहकार क्षेत्राचा अवलंब करण्याचे आवाहन केले. सहकार क्षेत्रातील कर्मचारी, व्यवस्थापन आणि सभासद यांचे संबंध परस्पर पूरक असतील तरच सहकार क्षेत्र टिकू शकेल, सहकार क्षेत्रात सुरुवातीच्या टप्प्यात संस्थांची प्रगती कशी झाली यावर देखील चर्चा होणे आवश्यक असल्याचे कडाडी म्हणाले. तसेच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सहकारी संस्था जतन करून त्यांच्या प्रगतीकडे विशेष लक्ष द्यावे, असे मतदेखील कडाडी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास खासदार मंगला अंगडी, बेळगाव डीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती, आमदार प्रकाश हुक्केरी, उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके, कर्नाटक राज्य मद्य नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन तुबाकी, बी. टी. पाटील, जगदीश कवटगीमठ, बी. एस. परमशिवय्या, बापूगौडा पाटील, बसवराज सुलतानपुरे , विविध मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.