महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वय मंत्री शंभूराजे देसाई येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बेळगाव दौऱ्यावर येणार असून त्यांनी तसे आश्वासन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांच्या सुपुत्राच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी गेलेल्या मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज रविवारी सीमाभाग समन्वय मंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेतली.
त्यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बेळगाव भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले. सदर निमंत्रण स्वीकारून मंत्री शंभूराजे यांनी येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपण निश्चितपणे बेळगाव दौऱ्यावर येऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू असे आश्वासन दिले आहे.
मंत्री शंभूराजे देसाई यांच्या व्यतिरिक्त मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी महाराष्ट्रातील नेते मंडळींची प्रत्यक्ष भेट घेतली.
तसेच सीमावासीय मराठी बांधवांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस अष्टेकर यांच्यासह खजिनदार प्रकाश मरगाळे, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, विनोद आंबेवाडीकर, शुभम हंडे, शुभम कलघटगी आदी उपस्थित होते.