सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार केवळ सोपस्कार म्हणून विधीमंडळात ठराव करत आहे. सरकारला या लढ्याचा विसर पडत आहे. त्यामुळे काळादिन केवळ सीमाभागात नव्हे तर महाराष्ट्रात पाळला पाहिजेत. त्यासाठी सरकारला जाग आणून द्यावी लागणार आहे, असे आवाहन राधानगरीचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी निषेध फेरीनंतर मराठा मंदिर येथे झालेल्या जाहीर सभेत केले. मध्यवर्ती समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते.
यावेळी के. पी. पाटील म्हणाले, सीमालढ्यात अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे आणि तोच विचार तेवत ठेवण्याचे काम आजचा तरूण वर्ग करत आहे. मराठ्यांना दुहीचा शाप आहे. पण, आता आपला शत्रू कोण आहे, हे जाणायची गरज आहे. कन्नडबरोबर जाणार्या मराठ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असून कर्नाटकात मराठीला कधीही न्याय मिळणार नाही.
त्यामुळे आता अन्यायाविरोधात संघटितपणे पेटून उठण्याची वेळ आली आहे. आपण किती आहोत, यापेक्षा आपण छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत, याची जाणीव ठेवून आपसातील सर्व मतभेद बाजूला सारून नव्याने एकत्र येवूया. तरच आगामी सर्वच निवडणुकांत आम्हाला यश मिळणार आहे. घुसखोरांना बाजुला काढावे लागणार आहे.
मनोहर किणेकर यांनी, 23 नोव्हेंबर रोजी सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. हा प्रश्न केवळ आमचा नसून महाराष्ट्र सरकार आहे. आज फेरीत युवक रस्त्यात उतरला. बिबट्याचे गाव बेळगाव अशी घोषणा देत असताना आता पेटून उठवण्याची वेळ आली आहे. आपल्याला लढल्याशिवाय काहीही मिळणार नाही. त्यामुळे आता मराठी शेतकर्यांना भूमीहीन करण्याचा प्रयत्न करणार्या सरकारविरोधातही लढा उभा करण्यात येणार आहे. त्यामुळे एकजुटीने पुढे जाऊन यश खेचून आणूया, असे आवाहन केले. यावेळी प्रास्ताविक करताना मालोजी अष्टेकर यांनी सीमालढ्याचा इतिहास सांगितला आणि कर्नाटक प्रशासन मराठी जनतेवर कसा अन्याय करत आहे, याची माहिती दिली.
मध्यवर्ती समिती अध्यक्ष 81 वर्षीय दीपक दळवी यांनी, लोकांना भावनिक साद घातली. युवा पिढीने आता लढ्यात भरीव योगदान देऊन न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबवू नका, असे आवाहन त्यांनी केले. सीमालढा हा युवकांसाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे लढ्यात जोरदार काम करण्याचे आवाहन केले.
प्रकाश मरगाळे व्यासपीठावर होते. दत्ता उघाडे यांनी सूत्रसंचालन तर मदन बामणे यांनी आभार मानले. यावेळी युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, अॅड. सुधीर चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमख प्रकाश शिरोळकर, श्रीराम सेना हिंदुस्थान अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, सरस्वती पाटील, वैशाली हुलजी, सुधा भातकांडे, आर. आय. पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे, वैशाली भातकांडे, रणजीत चव्हाण-पाटील, सरिता पाटील, रेणू किल्लेकर, अॅड. महेश बिर्जे, महेश जुवेकर, राजू पावले, चंद्रकांत कोंडुस्कर, सुनील अष्टेकर, हणमंत मजुकर, अॅड. एम. जी. पाटील आदींसह शेकडो लोक उपस्थित होते.