बेळगाव लाईव्ह विशेष : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नेतेमंडळींनी आश्वासने आणि आमिषांची खैरात वाटण्यास सुरुवात केली आहे. पुढील पाच वर्षांसाठी आपली तजवीज करण्यासाठी साड्या, हळदी कुंकू, भेटवस्तू, पैसे अशा अनेक माध्यमातून मतदारांना भुलवण्याचे तंत्र आतापासूनच आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून वापरण्यात येत आहे. मात्र केवळ सत्ता आणि पद यामागे लागलेल्या राजकारण्यांनी विकासाच्या नावाने बोंब ठोकली आहे. निवडणुका जवळ आल्या की वरवर दिखाऊपणा करण्यासाठी विकासकामे होत असल्याचे भासविणे, मात्र प्रत्यक्षात जनतेच्या हिताच्य दृष्टीने कोणतीही विकासकामे न करणे हेच चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.
सध्या खानापूरमध्येही अशीच काहीशी परिस्थिती पाहावयास मिळत आहे. खानापूर येथील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आजी माजी लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे. विविध योजना, प्रकल्प, भेटवस्तूंची खैरात, महिलांसाठी विविध कार्यक्रम अशा अनेक गोष्टींची आखणी करण्यात येत आहे. या भागात वास्तव्यास नसणाऱ्या समाजसेवकांकडूनही या भागातील जनतेसाठी विविध भेटवस्तू, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. राष्ट्रीय पक्षांच्या प्रवाहातील लोकप्रतिनिधींकडून आगामी निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरु आहे. मात्र या साऱ्या फाफट पसाऱ्यात येथील विकास मात्र खुंटला आहे, हि बाब प्रकर्षाने जाणवत आहे.
सोमवारी खानापूर येथील रुमेवाडी क्रॉस नजीक भीषण अपघात घडला, आणि या अपघातानंतर येथील अनेक प्रश्नांना वाचा फुटली. अपघातानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र याबाबत म्हणावी तितकी आपुलकी दाखविली नाही. सामाजिक कार्यकर्ते आणि नेते यावेळी सांत्वनासाठी हजर झाले मात्र या क्रॉसनजीक होणाऱ्या अपघातांची संख्या कशी कमी करता येईल, याकडे मात्र कोणाचेच आजपर्यंत लक्ष गेले नाही. या क्रॉसनजीक लोकप्रतिनिधींनी “आता मी काय करू?”असा प्रश्न विचारणारा फलक देखील एकदा उभारला होता. हि बाब महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असल्याने याची जबाबदारी झटकून देण्यात आली. लोकप्रतिनिधीच अशापद्धतीने हतबल झाले तर नागरिकांनी अपेक्षा तरी कुणाकडून करायची? हा प्रश्न येथील नागरिक करत आहेत. आपण या भागाशी निगडित असूनही आपल्या पदाचा वापर करून येथील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कोणतेच पाऊल उचलण्यात न येणे हे दुर्दैव आहे.
आजी माजी लोकप्रतिनिधी, आगामी काळात पदावर येणारे लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी या सर्वांनी स्वतःचा विकास करण्यात धन्यता मानली असल्याचेही या भागात बोलले जात आहे. कारखान्यांची उभारणी, साखर कारखान्याच्या अधिकारपदाची सूत्रे, विविध संस्थांची उभारणी, राष्ट्रीय पक्षाच्या प्रवाही गेलेले आजी माजी लोकप्रतिनिधी, दुर्गम भागात किट वितरण करून होणारे प्रमोशन यासारख्या अनेक गोष्टी या स्वतःच्या स्वार्थासाठीच करण्यात येत असल्याची तक्रार खानापूरवासीय करत आहेत. मात्र या भागाच्या विकासाकडे मात्र दुर्लक्ष होत असून यामुळे राजकारण्यांचा स्वतःचा विकास होत असला तरी जनता मात्र अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत आहे, हेच चित्र सध्या दिसून येत आहे.
खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीही काहीशी पिछाडीवर गेली आहे. मात्र खानापूर तालुक्याची धुरा महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आली तर आपल्या संस्कृतीसोबत येथील विकासाच्या दृष्टिकोनातूनही सकारात्मक विचार होईल, यात तिळमात्र शंका नाही. मात्र यासाठी खानापूर वासियांनी एकसंघ होऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे गरजेचे आहे. येथील नागरिकांना रेशन किट, साड्या, भेटवस्तू, पैशांच्या आमिषाची नाही तर या भागाच्या विकासाची नितांत गरज आहे. रस्ते, पायाभूत सुविधा, येथील तहसीलदार कार्यालयातील भ्रष्टाचारासंदर्भात होत असलेले आरोप, असे अनेक प्रश्न विकासाच्या दृष्टिकोनातून विचारात घेणे गरजेचे आहे. या साऱ्या गोष्टी सुरळीत झाल्या तर आगामी काळात खानापूर तालुका आणि खानापूर तालुक्यातील नागरिक नक्कीच विकासाच्या दिशेने झेपावतील यात शंका नाही.