Thursday, December 26, 2024

/

खानापुरातील मराठी माणूस एकवटणार

 belgaum

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन गटातील एकी करण्याची प्रक्रिया मध्यवर्तीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. त्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय घेऊन तीन सदस्यीय समिती गठन करण्यात आली.

ज्येष्ठ नेते राजाभाऊ पाटील, तालुका समितीचे सरचिटणीस एमजी पाटील आणि मध्यवर्तीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांचा त्या समितीत समावेश आहे. एकंदर खानापूर तालुक्याच्या एकीकरण प्रक्रियेत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आपला सहभाग नोंदवत आहे ही खानापूर समितीच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरत आहे.

आजवर महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापुरातील स्थानिक नेत्यांना एकीकरणाची प्रक्रिया पार पाडण्याची सूचना केली होती, पण ती प्रक्रिया रेंगाळत राहिल्यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापूर समितीच्या दोन्ही गटांच्या विनंतीवरून तीन सदस्यीय समिती स्थापन केली.आणि आता एकीकरण प्रक्रियेची पूर्णपणे सूत्रे या त्रिसदस्यीय समितीच्या अखत्यारीत एक बैठक घेऊन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलेली आहेत.त्यामुळे व्यवस्थित आणि नीटस असे रूप या प्रक्रियेला आलेलं आहे.

वादविवाद, वेगवेगळे व्यक्ती प्रपंच टाळले जाऊन केवळ तीन सदस्यीय समिती आणि खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन्ही गट मिळूनच ही प्रक्रिया पूर्ण होईल,यामध्ये इतर कुणाचाही हस्तक्षेप असणार नाही. आणि त्यावेळी जे काही निर्णय घेतले जातील ते दोन गट आणि त्रिसदस्यीय समितीच्या मार्फतच घेतले जातील असा निर्णय झालेला आहे. त्यामुळे अनेक फाटे न फुटता ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल. दोन्ही गट एकत्र येऊन खानापुरात महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद दुप्पट होऊन पुढील लढतीला आणि एकंदर मराठी माणसाच्या लढ्याला आणि खानापुरातील मराठी माणसाच्या अस्मितेला बळ येईल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे.Khanapur unity

आजवरच्या प्रक्रियेत एक बाब प्रकर्षाने लक्षात आली की अनेक लोकांनी या प्रक्रियेत सहभाग घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांच्या उद्देश हा कोणत्यातरी एका गटाचे तुष्टीकरण किंवा कोणत्यातरी एका व्यक्तीचा उदो उदो करणे अशा पद्धतीचा असल्यामुळे दोन्ही गटाला तो निर्णय मान्य होत नव्हता.महाराष्ट्र एकीकरण समिती ही मराठी माणसाची संघटना आहे आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती या प्रक्रियेत भाग घेताना ह्या मूळ उद्देशाला बांधील राहून ही मराठी माणसाला एकत्र करण्याची प्रक्रिया पार पाडत असल्यामुळे खानापूरच्या जनतेत आणि दोन्ही गटात एक प्रकारचे चैतन्य पसरलेलं आहे. आणि हा एक वेगळा पायंडा पडू पाहतोय की., मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती एकंदर सर्व गटांना आणि सीमावर्ती भागात जिथे म्हणून मराठी माणूस आहे त्या सर्व मराठी माणसांचे एकत्रीकरण करण्यासाठी थेट प्रक्रियेत उतरत आहे.अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीची आशादायक गोष्ट घडत आहे. त्यामुळे मध्यवर्तीचा छताखाली सगळे एकवटल्यामुळे लढा अधिक तीव्र करता येईल, त्याचबरोबर ह्या समितीच्या माध्यमातून इतरही रचनात्मक कामं होतील असाही लोकांच्यातून मतप्रवाह येत आहे.

काही खानापूर समितीतल्या कार्यकर्त्यांच्या एकमेकांच्या वैयक्तिक भेटी झालेल्या होत्या त्यातून एकंदर दोन्ही गट एकत्र येण्याची इच्छा दिसून आली आणि त्यांनी मध्यवर्तीकडे आपली इच्छा प्रदर्शित केली त्यामुळे अशा पद्धतीचा मध्यवर्तीकडून निर्णय घेण्यात आला. हा निर्णय एकंदर मराठी माणसाला सुखावणारा आणि बळ देणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.