Friday, January 10, 2025

/

खानापूर मधील भाजप नेते शपथ पाळणार का?

 belgaum

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या उपस्थितीत काल खानापुरात भाजपमधील नेते आणि कार्यकर्त्यांचा एक मेळावा पार पडला. या मेळाव्यात पक्षाशी प्रामाणिक राहणार आणि पक्ष पुढील विधानसभेला जो उमेदवार देईल त्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार अशी शपथ स्वतः मुख्यमंत्र्यांना द्यावी लागली.

अशी शपथ देण्याचे नेमके कारण काय याचा उहापोह केला असता असंख्य उमेदवारांची भाऊ गर्दी भाजपला त्रासदायक ठरणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळेच स्वतः मुख्यमंत्री येऊन शपथ देऊन गेले आहेत. हेच स्पष्ट होते. मात्र आता ही शपथ भाजपमधील नेते आणि कार्यकर्ते पाळणार का असा प्रश्न खानापुरातील सामान्य जनतेला पडला आहे.

नुकतेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि माजी आमदार अरविंद पाटील यांनी रीतसर भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या मागे असलेली नेत्यांची फौज पाहिली तर त्यांनाच भाजपचे तिकीट मिळणार अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आयात केलेल्या नेत्याला तिकीट दिले तर आम्ही गप बसणार नाही अशी भूमिका काही भाजप नेते घेऊ लागले आहेत.

त्यामुळे भाजपमध्ये उभी फूट पडणार अशी परिस्थिती खानापुरात पाहायला मिळत आहे. अरविंद पाटील यांना उमेदवारी दिली तर सर्व भाजपचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी राहतील का आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेली शपथ पूर्ण करतील का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

विठ्ठल हलगेकर हे नाव उमेदवारीच्या यादीत सध्यातरी पहिले आहे. मात्र त्यांना डावलून अरविंद पाटील यांना उमेदवारी दिली गेल्यास अरविंद पाटलांच्या मुळे भाजपला नुकसान होऊ शकते. असे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. विठ्ठल हलगेकर यांना मागील वेळी उमेदवारी दिली आणि त्यांचा निसटता पराभव झाला याला भाजपमधील मंडळीच कारणीभूत ठरली होती. त्यामुळे पुन्हा असेच वातावरण झाले तर भाजपचे खानापुरात पुन्हा एकदा नुकसान होऊ शकते.Bjp oath

प्रल्हाद रेमाणी आमदार होऊन गेल्यानंतर भाजपचा गड रोखण्यात अरविंद पाटील यांनी मोठी भूमिका निभावली होती. मात्र त्याला महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकी कारणीभूत होती. महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये फूट पडल्यानंतर एकीकरण समितीचा एकही उमेदवार निवडून आला नाही आणि काँग्रेसने बाजी मारली. काँग्रेसच्या अंजलीताई निंबाळकर या बहुमताने निवडून आल्या मात्र त्या निवडून येत असताना भाजपचे विठ्ठल हलगेकर निसटत पराभूत झाले. ही सारी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होऊ नये या दृष्टीने भाजपच्या नेत्यांनी कंबर कसलेली असल्याचे सध्या दिसून येत आहे. खानापूर मध्ये भाजपचा झेंडा रोवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना येऊन शपथ द्यावी लागते, मात्र ही शपथ आता पाळली जाईल का? शपथ पाळली जाईल या पद्धतीने उमेदवार दिला जाणार का? असा प्रश्न सध्या खानापूरच्या बाबतीत उपस्थित झाला आहे.

एकीकडे बलाढ्य उमेदवारांच्या मध्ये स्पर्धा सुरू असताना बाहेरून खानापूर तालुक्यात दाखल झालेले काही सामाजिक कार्यकर्तेही स्वतःला उमेदवारी मिळणार असे सांगून लॉबिंग करत आहेत. मोठ्या प्रमाणात लॉबिंग करत असल्याचे जाणवत आहे. त्या एकंदर परिस्थितीत कुणाचा निभाव लागणार आणि भाजप टिकणार का हा प्रश्न गंभीर बनला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.