बेळगाव लाईव्ह विशेष/ गेली 65 वर्ष भिजत पडलेला सीमाप्रश्न पाहता खुद्द केंद्र व राज्य सरकारलाच लोकशाहीची व्याख्या समजलेले नाही असा आरोप करत जम्मू -काश्मीर प्रमाणे बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी कर्नाटक सरकारने कोणती वेगळी घटना केली आहे का? असा सवाल सीमा लढ्याचे अभ्यासक दीपक पावशे यांनी केला आहे.
<span;>काळा दिनानिमित्त बेळगाव लाईव्हकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दीपक पावशे म्हणाले की, सीमाभागातील मराठी भाषिकांवरील होणारा अन्याय लक्षात घेता मला केंद्र व राज्य सरकारला प्रश्न विचारावासा वाटतो जम्मू आणि काश्मीरमधील लोक भारताची घटना मानत नाहीत. त्यांची स्वतःची स्वतंत्र घटना आहे. त्या पद्धतीने बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी कर्नाटक सरकारने कोणती वेगळी घटना केली आहे का? हे सरकार खोटे वाटते कारण स्वातंत्र्यवीर सावरकर कोणत्याही समाजात व राजकीय पक्षाविरुद्ध नव्हे तर ब्रिटिश सरकार विरुद्ध लढले होते. मात्र तरीही हे लोक सावरकरांना दोष देतात.
<span;> ज्या सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी 11 वर्षे अंदमान निकोबार येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली तशी शिक्षा कोणत्या गांधी कुटुंबाने, मोदी कुटुंबाने अथवा शहा कुटुंबाने भोगली आहे का?
हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1947 पूर्वी भारतात गोऱ्या लोकांचे राज्य होते. आता भारतीयांचेच राज्य आहे. मात्र या दोघांमध्ये फरक फक्त इतकाच आहे की गोऱ्या ऐवजी आता सावळे काळे लोक भारतात राज्य करत आहेत, बाकी सर्व ब्रिटिशांचे अनुकरणच आहे. त्यामुळे सीमा भागाचा विचार करता हा भाग अद्यापही गुलामगिरीत आहे असे मला वाटते. सीमा भागातील मराठी जनतेला आजतागायत न्याय मिळालेला नाही. गेली 65 वर्षे आम्ही मराठी भाषिक महाराष्ट्रात जाण्यासाठी सीमाप्रश्नाचा लढा लढत आहोत. लोकशाहीची कोणतीही लक्ष्मण रेषा न ओलांडता हा लढा सुरू आहे. मात्र अजूनही न्याय मिळालेला नाही. याचे कारण ह्या सरकारला लोकशाहीची व्याख्या समजलेली नाही. मात्र भारतातील राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे की सीमाभागातील मराठी भाषिकांचा तीन गोष्टींवर विश्वास आहे. त्या तीन गोष्टी म्हणजे इच्छा, विश्वास आणि आत्मविश्वास या होत.
या गोष्टींच्या जोरावर त्यांना जे हवे ते त्यांच्याकडे स्वतःहून येणार आहे असे सांगून सध्याच्या खोट्या सरकारचे पतन करण्यासाठी समस्त मराठी भाषिकांनी संघटित व्हावे असे आवाहन दीपक पावशे यांनी शेवटी केले.