बेळगाव लाईव्ह : छत्रपती शिवरायांचे आचार, विचार, तत्वे आणि त्यांचे स्मरण ठेवणारे लाखो मावळे आजही आपल्याला पाहायला मिळतात. परंतु छत्रपतींच्या बलाढ्य स्वराज्याची जोपासना आणि संवर्धन करण्यासाठी क्वचितच शिवसैनिक पुढाकार घेत असलेले आपण पाहतो.
महाराष्ट्रातील ३५० हुन अधिक गडकोटांमधील बहुतांशी गड-किल्ल्यांची अवस्था दयनीय आहे. महाराष्ट्र सरकार किल्ले संवर्धनासाठी पुढाकार घेतच आहे. परंतु असंख्य शिवसैनिक देखील यासाठी पुढाकार घेत असून बेळगावमधील अभियंते आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनीही अशाच पद्धतीचे एक कार्य केले आहे.
मण्णूर या गावातील अभियंते व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी बेळगाव जिल्ह्यात काळाच्या ओघात दुर्लक्षित असलेल्या सडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी मदतनिधी देऊन हातभार लावला आहे.येथील छत्रपती शंभूराजे परिवार, बेळगाव या विभागाच्यावतीने सडा किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी छत्रपती शंभूराजे परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित दुर्गसंवर्धन मोहीम येत्या २४-२५ डिसेंबर रोजी आयोजित केली आहे.
यादरम्यान संपूर्ण किल्ला परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या दुर्गसंवर्धन मोहिमेच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी कटींग मशीनसाठी मदत निधी देऊन सहकार्य केले. त्याबद्दल संघटनेच्या वतीने आर. एम. चौगुले यांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
अखंड महाराष्ट्रासह सीमाभागातदेखील छत्रपतींचा इतिहास सांगणाऱ्या अनेक पाऊलखुणा आहेत. बेळगावमधील बहुतांशी छोटे-मोठे गड-किल्ले आजही संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत. बेळगावला ऐतिहासिक परंपरा आहे. बेळगावमधील भुईकोट किल्ला मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या अंतर्गत देखभाल करण्यात येत असल्याने खंदक वगळता आतील किल्ल्याची देखभाल योग्यपद्धतीने होत आहे. मात्र बेळगाव शहराच्या सभोवताली अनेक गड-किल्ले अजूनही संवर्धनाच्या प्रतीक्षेत उभे आहेत.