बेळगावमधील सरकारी अतिथी विश्रामगृहात प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री गोविंद कारजोळ माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यावर टीकास्त्र सोडले असून आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही मतदार संघातून ते निवडणूक जिंकणार नाहीत, अशी भविष्यवाणी वर्तविली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस या दोन्ही गोष्टी लक्ष्य करून गोविंद कारजोळ यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढविली तरी त्यांचा पराभव निश्चित आहे. कोलारमधून जरी त्यांनी निवडणूक लढविली तरी त्यांना पराभवच पत्करावा लागणार हे निश्चित असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे. काँग्रेसला आता देशात स्थान उरले नाही. घरात दिवा पेटवण्यासाठी काँग्रेसकडे दिशाच उरली नसल्याची टीकाही पालकमंत्र्यांनी केली. निवडणुका जवळ आल्यानंतर दलित आणि मागासवर्गीयांना हाताशी धरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसच्या या प्रयत्नांना आता जनता किंमत देत नाही. खुद्द काँग्रेसमधील मोठमोठे नेते काँग्रेसला राम राम ठोकत आहेत, अशी अवस्था आवाज काँग्रेसची आहे. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर काँग्रेसचे कट्टर समर्थक गुलाम नबी आझाद यांनीही काँग्रेसला हात दिला असून मनमोहन सिंग पंतप्रधान पदी कार्यरत असतानाच मल्लिकार्जुन खर्गे यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा दिली असती तर दलितांना सन्मान मिळाला असता असे मत गोविंद कारजोळ यांनी व्यक्त केले.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याला ‘विवेक’ योजनेंतर्गत २४५ वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या असून यासाठी ३६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहितीही पालकमंत्र्यांनी दिली.
ज्या ज्या ठिकाणी प्राथमिक शाळांसाठी वर्गखोल्यांची गरज आहे त्या ठिकाणी आज बांधकामाला सुरुवात करण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रसारमाध्यमांनी सतीश जारकीहोळी यांच्या वादग्रस्त विधानाबाबत प्रतिक्रिया विचारली असता यावर प्रतिक्रिया देण्यास मात्र पालकमंत्र्यांनी नकार दर्शविला.