गोवा येथे कन्नड भवन उभारायचे असेल तर कन्नड भाषिकांनी येथे जमिनीची खरेदी करावी, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.अखिल गोवा कन्नड संघातर्फे बिचोलिम उत्तर गोवा येथे रविवारी आयोजित केलेल्या ७ व्या सांस्कृतिक संमेलनात सावंत यांनी ही प्रतिक्रिया दिली.
प्रमोद सावंत पुढे म्हणाले, यापूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकदा आपल्याशी पत्रव्यवहार करून गोव्याच्या किनारपट्टीवर कन्नड भवन उभारणीसाठी दोन एकर जागेची मागणी केली आहे. तसेच येथील कन्नड भाषिकांच्या समस्यांसंदर्भातही आपल्याशी चर्चा केली आहे. अलीकडेच त्यांनी पुन्हा एकदा येथील जमिनीची मागणी केली आहे. गोवा सरकारकडे जमिनीची कमतरता असून या भागात कन्नड भवन उभारणीसाठी कन्नड भाषिकांनी जमीन खरेदी करावी किंवा ज्या जमिनी त्यांनी आधीच खरेदी केल्या आहेत त्या जमिनीवर कन्नड भवनची उभारणी करावी, असे आवाहनदेखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
गेल्या चार दशकांपासून गोव्यात राहणाऱ्या कन्नड भाषिकांकडून कन्नड भवनची मागणी करण्यात येत असून यानुसार मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी या भागात कन्नड भवन उभारणीसाठी १० कोटींची तरतूदही केली आहे.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले रेणुकादेवीचे दर्शन
बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीचे दर्शन घेण्यासाठी आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कुटुंबासमवेत दाखल झाले होते. कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा, गुजरात यासह विविध ठिकाणाहून लाखो भाविक याठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात. पुढील महिन्यात येथे वार्षिक यात्रा भरविण्यात येते. लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या यात्रेच्या निमित्ताने आज गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासमवेत हजेरी लावून श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले. विधिवत पूजन, खणानारळाची ओटी देवीला अर्पण करण्यात आली.