बेळगाव शहरातील विजयनगर येथील एका गॅस वितरण एजन्सीकडून घरगुती गॅस सिलेंडर धारकांना 10 किलोचा फायबर गॅस सिलेंडर घेण्याची सक्ती केली जात असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
विजयनगर येथील एका गॅस एजन्सीकडून गेल्या बऱ्याच वर्षापासून इंडियन गॅस कंपनीच्या घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो. मात्र अलीकडे सदर एजन्सीकडून आयओएसचे पत्र आल्याचे सांगून जुन्या गॅस सिलेंडर एवजी नवा फायबरचा 10 किलोचा गॅस सिलेंडर घेण्याची सक्ती केली जात असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे.
तसेच नव्या गॅससाठी 5 हजार रुपयांची अनामत रक्कम देखील मागितली जात असल्याचे या एजन्सीचे ग्राहक उमेश आपटेकर यांनी सांगितले. तसेच फायबरचाच गॅस सिलेंडर घेण्याचे नाकारून तो घेण्याची सक्तीच असेल तर तसे लेखी द्या अशी मागणी करताच उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली.
दरम्यान त्याच एजन्सीतील दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने नवा फायबरचा गॅस सिलेंडर घेण्याची कोणतीही सक्ती नसल्याचे स्पष्ट केल्याचे आपटेकर यांनी सांगितले.
एकंदर प्रकार पाहता संबंधित एजन्सीकडून आयओएस सक्तीच्या नावाखाली 5 हजार रुपये घेऊन 10 किलोचा फायबर गॅस सिलेंडर जाब न विचारणाऱ्या सरळ मार्गी ग्राहकांच्या गळ्यात मारला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. तरी गॅस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.