वनपरिमंडळातील बेळगाव विभागामध्ये येत्या दि. 23 ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये वन खात्याच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य वन संरक्षणाधिकारी (सीसीएफ) मंजुनाथ चव्हाण यांनी दिली.
शहरातील अरण्य भवन येथे आज रविवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मंजुनाथ चव्हाण म्हणाले की, येत्या 23, 24 व 25 नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये वन खात्याच्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये राज्यातील 13 वन परिमंडळ आणि एका प्रशिक्षण अकादमीचे अधिकारी व कर्मचारी भाग घेणार आहेत. या क्रीडा महोत्सवासाठी एकूण 1100 खेळाडूंनी यापूर्वीच नांव नोंदणी केली आहे. यापैकी 900 पुरुष आणि 200 महिला क्रीडापटू आहेत.
सदर तीन दिवसीय क्रीडा महोत्सवातील स्पर्धा शहरातील विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी (व्हिटीयू) कॅम्पस तसेच बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणी होणार आहेत. तसेच वनविभागाच्या शिपायापासून ते फॉरेस्ट विभाग प्रमुख, पीसीसीएफपर्यंतचे सर्व दर्जाचे अधिकारी या क्रीडा महोत्सवात सहभागी होतील, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
पत्रकार परिषदेचे औचित्य साधून यावेळी सीसीएफ मंजुनाथ चव्हाण यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी वन परिमंडळाचे डीसीएफ हर्ष भानू, पिकेएम प्रशांत, सी. जी. मिर्जी, अँथनी मरिअप्पा, एस. के. लगोरवर, एसीएफ सुनिता निंबरगी, एम. बी. कुसनाळ, शिवरुद्रप्पा कबाडगी आदी उपस्थित होते.