सार्वत्रिक निवडणुकांसाठी वापरण्यात येत असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासाठी ईव्हीएम हिंडलगा, बेळगाव येथे नव्या स्ट्रॉंग स्ट्रॉंग रूमची इमारत बांधण्यात आली असून राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा वापर करून रंगरंगोटी करण्यात आलेली ही इमारत साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
हिंडलगा गावच्या हद्दीतील रेशीम फार्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेत स्ट्रॉंग रूमची नूतन इमारत बांधण्यात आली आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून आकर्षक रंगरंगोटी ही झाली आहे.
राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा वापर त्यासाठी करण्यात आला आहे. इमारतीवर दर्शनीय भागातील भिंतीवर निवडणूक आयोगाचे चिन्ह देखील रेखाटण्यात आले आहे. सुमारे 25 हजार चौरस फूट जागेत गेल्या अनेक महिन्यापासून या इमारतीचे बांधकाम सुरू होते. मात्र तेथे नेमके कोणते बांधकाम सुरू आहे? याची माहिती हिंडलगा किंवा परिसरातील नागरिकांना नव्हती, पण आता रंगरंगोटी व भिंतीवरील निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह पाहून नागरिकांना ती निवडणूक आयोगाची इमारत असल्याचे समजले आहे.
निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या इमारतीचा वापर स्ट्रॉंग रूम म्हणून केला जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याचप्रमाणे जिल्हा पंचायत तालुका पंचायत व ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ही जास्त आहे जिल्ह्यात बेळगाव महापालिकेसह नगर स्थानिक स्वराज्य संस्था ही जास्त आहेत त्यामुळे सर्वाधिक ईव्हीएम मशीन बेळगावसाठी आवश्यक असतात.
निवडणुकीसाठी वापरले जाणारे ईव्हीएम मशीन बेळगावत आणल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतंत्र असे स्ट्रॉंग रूम नव्हते. त्यासाठी एपीएमसी गोदामाचा वापर केला जातो. मात्र आता कायमस्वरूपी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे. लवकरच या स्ट्रॉंग रूम इमारतीचे उद्घाटन होणार असल्याचे कळते.