बेळगाव लाईव्ह : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली याचिका नव्या वळणावर येऊन ठेपली असून दोन्ही राज्यांच्या राज्यकर्त्यांनी याविषयावर मतप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून परस्पर विरोधी प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्न हा चर्चेने सोडवावा, असे मत व्यक्त केले आहे.
सीमाप्रश्नी यापूर्वी दोन्ही राज्यांच्या राज्यपालांची बैठक पार पडली आहे. ६७ वर्षांचा इतिहास असलेला हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून कायदेशीर मार्गाने लढाईही सुरु आहे. मात्र यापलीकडे हा प्रश्न संवादातून सोडवावा अशी महाराष्ट्र सरकारची भूमिका असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी मांडले आहे. दोन्ही राज्यांचे राज्यपालांनी केंद्र सरकारकडे आपली भूमिका मांडावी, यासंदर्भात बैठकही घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठी भाषिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ लागू केला असून यामध्ये नुकतीच वाढ देखील करण्यात आली आहे. यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महाराष्ट्रात आयोजिण्यात आलेल्या सीमाप्रश्नासंदर्भातील बैठकीत,सीमाप्रश्न अधिक गुंतागुंतीचा न बनवता चर्चेने सोडविण्याकडे भर द्यावा अशा सूचना अनेकांकडून मिळाल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.