ब्रिटिश काळात स्थापन होऊन एकेकाळी ‘सैनिकांचे फॅक्टरी’ समजल्या जाणाऱ्या आणि अलीकडे कांही वर्षांपासून कांहीशा वाईट स्थितीत सुरू असलेल्या कॅम्प येथील मराठा रेजिमेंट जवानांच्या मुलांसाठीच्या मराठा वाॅर मेमोरियल हॉस्टेलमध्ये प्रगत दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देऊन या होस्टेलला गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी सदर हॉस्टेलचे माजी विद्यार्थी असलेल्या सेवानिवृत्त लष्करी अधिकारी व जवानांनी केली आहे.
कॅम्प येथील मराठा वाॅर मेमोरियल होस्टेलमध्ये सन 1935 ते 2020 या कालावधीत राहिलेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आज शनिवारी पार पडले. या स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सेवानिवृत्त लष्करी अधिकारी व जवान बोलत होते. यावेळी देण्यात आलेल्या माहिती नुसार, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मराठ्यांनी गाजवलेल्या मर्दुमकी नंतर त्यांच्या पाल्यांसाठी ब्रिटिश सरकारने 1935 मध्ये मराठा वाॅर मेमोरियल हॉस्टेलची कॅम्प बेळगाव येथे स्थापना केली.
ग्लोब टॉकीजनजीक असलेल्या या हॉस्टेलने 1935 ते 2020 पर्यंत भारतीय सैन्य दलाला 100 च्या आसपास अधिकारी दिले. त्याचप्रमाणे या हॉस्टेलचे 95 टक्के विद्यार्थी संरक्षण दलात विविध खात्यात आपली सेवा देत आहेत. या खेरीज बरेच जण सैन्य व इतर दरातून सेवानिवृत्त झाले असून काहींनी बाहेरील जगात नांव कमावले आहे. अजय सावंत यांनी तर क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार पटकाविला आहे. मराठा वाॅर मेमोरियल होस्टेलने देशाला निधड्या छातीचे जवान देण्याबरोबरच डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील, पत्रकार आणि खेळाडू देखील दिले आहेत.
एकेकाळी मोठा नावलौकिक असलेल्या भरभराटीत चालणाऱ्या या होस्टेलला अलीकडच्या काळात वाईट दिवस आले आहेत. पूर्वी मराठा सेंटरचा प्रत्येक जवान सदर हॉस्टेलमध्ये आपल्या मुलाला प्रवेश मिळावा यासाठी धडपडत असायचा. त्याकाळी या हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांची संख्या देखील खूप होती.
संरक्षण दलातील उत्कृष्ट अधिकारी, जवान बनण्यासाठीचा मजबूत पाया या हॉस्टेलमध्ये घातला जात असे. सदर हॉस्टेल मधून बाहेर पडणारा विद्यार्थी निश्चितपणे संरक्षण दलातच जाणार हे ठरलेले असायचे. त्यामुळेच त्याकाळी मराठा वाॅर मेमोरियल होस्टेलला ‘सैनिकांची फॅक्टरी’ असे देखील कौतुकाने संबोधले जायचे. मात्र अलीकडे कांही वर्षापासून या हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली असून सध्या कांही मोजकेच विद्यार्थी या हॉस्टेलमध्ये आहेत.
तेंव्हा स्थानिक लष्करी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या होस्टेलमध्ये प्रगत दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ज्यामुळे इतिहास जमा झालेला या हॉस्टेलचा सुवर्णकाळ पुन्हा परत येईल, अशी अपेक्षा या हॉस्टेलचे माजी विद्यार्थी असलेल्या सेवानिवृत्त लष्करी अधिकारी व जवानांनी व्यक्त केली आहे.