बेळगाव तालुक्यातील सुपीक शेत जमिनीसह शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या बेळगाव रिंग रोडच्या विरोधात येत्या 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या भव्य चाबूक मोर्चाला पाठिंबा देऊन शेतकऱ्यांचे हित जपावे, अशा विनंतीचे निवेदन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि क्रेडाई या संघटनांना सादर करण्यात आले आहे.
बेळगावचा नियोजित रिंग रोड प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली बेळगाव येत्या 28 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांचा विराट चाबूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा मोठा प्रमाणात यशस्वी करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध संघ -संस्था आणि संघटनांचा पाठिंबा मिळविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने काल सोमवारी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व सदस्यांच्या शिष्टमंडळाने कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (बीसीसीआय) अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यांची भेट घेऊन चाबूक मोर्चाला पर्यायाने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याची विनंती केली.
तसेच तशा आशयाचे निवेदन त्यांना सादर केले. याप्रसंगी म. ए. समितीचे नेते शिवाजी सुंठकर, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, ॲड. एम. जी. पाटील, ॲड. सुधीर चव्हाण, एस. एल. पाटील, आर आय पाटील, ॲड. प्रसाद सडेकर आदींसह चेंबर ऑफ कॉमर्सचे सेक्रेटरी स्वप्निल शहा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बेळगावातील वाहतूक समस्या निवारण्यासाठीच्या रिंग रोडमुळे संबंधित 32 गावातील शेतकरी कसे देशोधडीला लागणार आहेत. त्याचप्रमाणे रिंग रोड ऐवजी फ्लाय ओव्हर ब्रिजचा पर्याय कसा योग्य आहे, याबाबतची माहिती माजी आमदार मनोहर किनेकर यांनी अध्यक्ष पोरवाल यांच्यासह बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना पटवून दिली. तसेच सरकारच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव दक्षिणचे आमदारांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआय आणि बेळगाव लघुउद्योजक संघटनेचे पदाधिकारी येत्या गुरुवारी बेंगलोर मुक्कामी मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. त्याभेटी प्रसंगी चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावच्या अन्यायी रिंग रोड संदर्भातील माहिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून त्यांना शेतकऱ्यांची बाजू पटवून द्यावी, अशी विनंती बीसीसीआयच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना केली.
बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर समितीच्या शिष्टमंडळाने ‘क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायीक संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी हिरेमठ यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनाही निवेदन सादर करून चाबूक मोर्चाला पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अन्यायी रिंग रोड प्रकल्प रद्द होणे किती गरजेचे आहे याची माहिती देण्यात आली. याप्रसंगी समितीच्या उपरोक्त सदस्यांसह क्रेडाईचे सेक्रेटरी हर्षद कलघटगी, कुईश नुराणी, सचिन कट्टीमनी आदी उपस्थित होते.