मतदारांचा कौल सरकारला मान्य नाही का? असा प्रश्न उपस्थित करत बेळगाव महापालिकेचे नूतन अपक्ष नगरसेवक शंकर पाटील यांनी आज बेळगाव महापालिकेसमोर हातात फलक धरून नगरसेवकाचे अधिकार मिळावेत यासाठी आंदोलन केले.
मतदारांनी नगरसेवकांची निवड केली. सरकार मात्र हक्कापासून वंचित ठेवत आहे. मतदार राजाचा कौल सरकारला मान्य नाही का? असा कन्नड, मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये मजकूर असलेला फलक हातात धरून नगरसेवक शंकर पाटील आज शनिवारी महापालिकेसमोर एकाकी आंदोलन केले. गेले 14 महिने झाले आम्ही बेळगाव महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आलो आहोत मात्र अद्यापही आमचा शपथविधी झालेला नाही. शपथविधी झालेला नसल्यामुळे आम्ही अधिकृतरित्या नगरसेवक म्हणून जनसेवा करू शकत नाही. आमच्या प्रभागांचा विकास करू शकत नाही. याच्या निषेधार्थ मी एकटा आज समस्त मतदारांच्या वतीने नाराजी व्यक्त करत आहे परंतु सरकारने लागलीच योग्य ती कार्यवाही न केल्यास लवकरच बेळगाव महापालिकेसमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल, असे नगरसेवक शंकर पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या 2 सप्टेंबर 2021 रोजी बेळगाव महापालिकेची निवडणूक झाली मतदान झाल्यानंतर 10 सप्टेंबरला निकाल आला. मात्र एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी अद्याप बेळगाव महापालिकेच्या महापौर महापराचे निवड झालेली नाही. निवडून येऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी आपला शपथविधी झाला नसल्याने नगरसेवकात कमालीची अस्वस्थता आहे आणि विद्यमान सरकाराबद्दल नाराजी देखील आहे. मात्र अद्याप याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.
अनेकदा येथील स्थानिक आमदारांनी महापौर पदाची निवडणूक लवकरच होईल असे वक्तव्य केले. मात्र पुढे काहींही घडले नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून लवकरात लवकर महापौर निवडणूक व्हावी अशी सगळ्यांची भावना आहे. मागील महिन्यात काँग्रेसकडून बेळगाव शहराच्या दोन्ही विद्यमान आमदारांना महापौर व उपमहापौरांचे गाऊन भेट देऊन त्यांचा उपहास करण्यात आला होता.
बेळगावचे दोन्ही आमदार महापौर -उपमहापौर असल्याची टीका करूनही कोणतीच हालचाल न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. आता नगरसेवक शंकर पाटील यांनी हातात फलक घेऊन केलेल्या आंदोलनामुळे तरी सरकारचे डोळे उघडणार का? हे पहावे लागेल.