मुंबई येथे नुकत्याच झालेल्या सीमाप्रश्नी उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराजे देसाई या दोघांची सीमा समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या दोघांनाही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पत्र लिहून बेळगाव दौरा करून कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी विनंती वजा मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात असलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नाच्या खटल्याची सुनावणी 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्या प्रश्नावर दोन्ही समन्वयक मंत्र्यांनी या प्रश्नासंदर्भात बेळगाव येथील कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशा आशयाचा तपशील असणारे पत्र मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या स्वाक्षरीसह धाडण्यात आले आहे.
चंद्रकांत दादा पाटील हे गेल्या मागील टर्ममध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सीमाप्रश्नी समन्वयक मंत्री होते. मात्र त्यांनी बेळगावला एकदाही येण्याचे किंवा बेळगावचा दौरा करून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यात कधीही रस दाखविला नव्हता.
दुसरीकडे मंत्री शंभूराजे देसाई यांची समन्वयक मंत्री म्हणून पहिल्यांदाच नियुक्ती झाली आहे. शंभूराजे सातारा जिल्ह्यातील कराडचे शिवसेना आमदार आहेत. सध्या ते शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत.
या दोन्ही मंत्र्यांनी लवकरात लवकर बेळगावला यावं आणि कार्यकर्त्यांच्या भेट घेऊन चर्चा करावी अशी विनंती वजा मागणी मध्यवर्तीने केली आहे. आता यापूर्वी बेळगावला कधी न आलेले मंत्री चंद्रकांत दादा पाटील मध्यवर्तीचा मान राखून यावेळी तरी बेळगावला येतात का आणि चर्चा करतात का? हे पहावे लागणार आहे