बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी अवघा ६ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असून अनेक राजकारणी युद्धपातळीवर निवडणूक रणनीती आखत आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक नेतेमंडळी विरोधकांवर टीका देखील करत असून विधानसभा निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत.
बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी आज पत्रकारांना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली असून यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. काँग्रेस पक्षात उमेदवारी मिळविण्यासाठी पैसे द्यावे लागतात, तरच उमेदवारी दिली जाते. शिवाय काँग्रेसमध्ये गरिबांना स्थान नाही.
ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच काँग्रेसमध्ये स्थान आहे. काँग्रेस हा घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे. या पक्षात असमाधानी असलेले अनेकजण आहेत. एकाच कुटुंबातील तिघांना पैशाच्या जोरावर कर्नाटकात उमेदवारी देणारा काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर त्सिमीत आहे त्याच पद्धतीने राज्यात आणि बेळगाव जिल्ह्यात देखील त्सिमीत आहे. बेळगावची जनता समजूतदार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणाच्या बाजूने कौल द्यायचा हे देखील जनतेला माहीत आहे, असे सांगत आमदार अनिल बेनके यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
याचप्रमाणे बेळगाव उत्तर मतदार संघाबाबत भाजपासाठी रणनीती सांगताना ते म्हणाले, बेळगाव उत्तर मतदार संघात कोणत्याही प्रकारची अडचण नाही. या भागात संघटन, विकासकाम, जनसंपर्क, विविध क्षेत्रातील समस्यांचे निराकरण या सर्व गोष्टी उत्तमप्रकारे हाताळण्यात आल्या आहेत, हि आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.
भाजप हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष असून आपल्या पक्षात प्रत्येकाला उमेदवारी विचारण्याचा हक्क आहे. सर्व गोष्टींचा विचार करून योग्य उमेदवार निवडण्याचा हक्क हायकमांडकडे असून भाजपमध्ये पैशाच्या जोरावर उमेदवारी देण्यात येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. हायकमांड जो निर्णय घेईल, त्या निर्णयावर एकसंघपणे कार्य करण्याची परंपरा भाजपमध्ये असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.