Monday, February 10, 2025

/

‘त्या’ घटनेनंतर बेळगावमध्ये भाजप नेत्यांची तातडीची सभा

 belgaum

केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी ‘हिंदू’ शब्दावरून केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात विविध ठिकाणी उमटू लागलेले असतानाच जारकीहोळी समर्थकांनी सदर विधानाच्या आणि जारकीहोळींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

शुक्रवारी घटप्रभा येथे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या वाहनाला घेराव घालून जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने केली. यानंतर आज बेळगावमध्ये सर्व भाजप नेत्यांची तातडीची बैठक बोलाविण्यात आली असून आजी माजी लोकप्रतिनिधी आणि भाजप नेत्यांसह बेळगावमधील सर्किट हाऊस येथे प्रदीर्घ बैठक सुरु आहे. काल झालेल्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सदर बैठक बोलाविण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

आमदार सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या विधानाचा राजकीय दृष्टिकोनातून लाभ घेण्यासाठी विपर्यास केला जात असल्याचा आरोप अनेक दलित संघटनांनी केला असून आमदार सतीश जारकीहोळी यांना राजकीय द्वेषापोटी हिंदुविरोधी असल्याचे भरविण्यात येत असल्याचा आरोप जारकीहोळी समर्थक करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विधानाचा वापर करून, चुकीच्या पद्धतीने याबाबत सामाजिक शांतता भंग करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप जारकीहोळी समर्थक करत आहेत.Bjp meeting

याच संतापातून घटप्रभा येथे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या वाहनाला घेराव घालून जारकीहोळी समर्थकांनी आंदोलन केले. जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी केली. यानंतर आज तातडीने बेळगाव मधील सर्किट हाऊस मध्ये बैठक बोलाविण्यात आली असून सदर बैठकीत माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, विधान परिषदेचे सरकारचे माजी मुख्य सचेतक महांतेश कवटगीमठ, आमदार महांतेश दोड्डगौडर यांच्यासह बेळगावमधील सर्व भाजप नेते, आजी माजी आमदार, खासदार, पदाधिकारी यांचा समावेश आहे.

महत्वाच्या पदावर कार्यरत असणाऱ्या इराण्णा कडाडी यांच्या वाहनासमोर जारकीहोळी समर्थकांनी केलेल्या निदर्शनानंतर भाजप कशापद्धतीने प्रत्त्युत्तर देईल, सदर घटनेचा निषेध कोणत्या पद्धतीने करेल आणि हा वाद कोणत्या वळणावर जाईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.