अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीवर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी, इच्छुकांची उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ सुरु झाली असून काँग्रेसकडे बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघासाठी तब्बल ७ जणांचे अर्ज सादर झाले आहेत. यामध्ये सेठ कुटुंबातील तिघांचे उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्यात आले असून उत्तर मतदार संघातील मुस्लिम मतदारांचे प्राबल्य पाहता आगामी निवडणुकीसाठी उत्तर मतदार संघात काँग्रेसकडून उर्दू भाषिक उमेदवार जाहीर होण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत माजी आमदार फिरोज सेठ यांचा भाजपचे आमदार अनिल बेनके यांच्याकडून पराभव झाला होता. या पराभवानंतर फिरोज सेठ यांनी पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी मागणी केली आहे. बुधवारी बेंगळुरू येथील कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्यालयात माजी आमदार फिरोज सेठ यांच्यासह त्यांचे बंधू राजू सेठ आणि मुलगा फैझान सेठ अशा एकाच कुटुंबातील तिघांनी उमेदवारीची मागणी करत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे अर्ज सादर केले आहेत.
आमदारपद भूषविलेले फिरोज सेठ, युथ काँग्रेसच्या माध्यमातून कार्यरत असणारे फैझान सेठ आणि अंजुमन संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असणारे राजू सेठ यांच्यासह २ वेळा नगरसेवक पदी विराजमान झालेले न्यू गांधी नगर येथील विद्यमान मनपा नगरसेवक अझीम पटवेगार गेल्या पंचवीस हून अधिक वर्षापासून काँग्रेस साठी कार्य करत असलेले बेळगाव काँग्रेसमधील वरिष्ठ नेते हाशिम भाविकट्टी यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे.
यांच्यासह कणबर्गी येथील सुधीर गड्डे आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी अशा एकूण ७ इच्छुकांनी केपीसीसीकडे उमेदवारीची मागणी करत केपीसीसीकडे २ लाख रुपयांचे डिपॉझिट देखील दिले आहे. बेळगाव दक्षिण मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आणि प्रभावती सी यांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे.
उत्तर’साठी उर्दू भाषिक उमेदवाराचीच दावेदारी का?
बेळगाव उत्तर मतदार संघात काँग्रेसकडून उर्दू भाषिक उमेदवारांची संख्या अधिक आहे, कारण या मतदार संघात एकूण २७५००० मतदारांपैकी अंदाजे जवळपास ७०००० मतदार हे मुस्लिम समाजातील आहेत. आणि यापाठोपाठ लिंगायत आणि मराठी समाजाचे मतदार आहेत. याशिवाय बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदार संघात एका मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी देण्याची आवश्यकता असल्याने मुस्लिम समाजातील उमेदवाराची अधिक दावेदारी या मतदार संघात अधिक आहे.
याचप्रमाणे काँग्रेसकडे मुस्लिम मतदारांची संख्या अधिक असल्याकारणाने मुस्लिम समाजाला उमेदवारी देणे आवश्यक असल्याने उत्तर मतदार संघातून काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवाराला प्राधान्य देण्यात येते असेही राजकीय जाणकारांचे मत आहे. आगामी निवडणुकीसाठी उत्तर मतदार संघातून एकाच कुटुंबातील ३ उमेदवारी अर्ज यासह नगरसेवक आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशा ५ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे.
शिवाय उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ५ दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला असून याकाळात आणखी काही इच्छुकांचे अर्ज सादर होण्याची शक्यता आहे. दरम्यान काँग्रेसमधून उत्तर मतदार संघासाठी मुस्लिम समाजालाच उमेदवारी देण्याची शक्यता राजकीय जाणकारातून व्यक्त होत आहे.