जागतिक पातळीवर बेळगावचा फाउंड्री उद्योग हा एका महत्त्वाच्या टप्प्यावर असताना, त्याचीच पुढची पायरी बेळगावच्या उद्योजकाने गाठली आहे.’छोट्या शहरातील बडे उद्योजक ‘या कॅटेगरीत २३००कोटींची मालमत्ता असणारे अशोक आयर्न वर्क्स चे संचालक जयंत हुंबरवाडी यांची छबी भारतातील आघाडीचे मासिक इंडिया टुडेच्या मुखपृष्ठावर झळकली त्यामुळे बेळगावच्या फाउंड्री उद्योगाला नवचैतन्या बरोबर नवीन ओळख मिळाली.
जगप्रसिद्ध मासिक इंडिया टुडेने ‘स्मॉल टाऊन टायकुन्स’ या आपल्या कव्हर स्टोरीसाठी देशातील सात शक्तिशाली उद्योजकांची निवड केली असून मासिकाच्या मुखपृष्ठावर त्यांची छायाचित्रे छापली आहेत, ज्यामध्ये बेळगावच्या अशोक आयर्न ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जयंत हुंबरवाडी यांना स्थान दिले आहे.
बेळगावसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असून यामुळे देशाच्या नकाशावरील बेळगावची औद्योगिक क्षमता आणि महत्व अधोरेखित झाले आहे. जयंत हुंबरवाडी हे सेंटपॉल हायस्कूल आणि जीआयटी इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. इंडिया टुडेने आपल्या कव्हर स्टोरीच्या माध्यमातून सदर सात उद्योजकांनी आपापल्या क्षेत्रात कशा पद्धतीने उंची गाठली आहे यावर प्रकाश टाकला आहे.
जयंत हुंबरवाडी आणि अशोक आयर्न ग्रुप यांचे वय समान म्हणजे 48 वर्षे असून हुंबरवाडी यांची निव्वळ संपत्ती 2300 कोटी रुपये इतकी आहे. बेळगाव जिल्हा जीएसटी खात्याने गेल्या जुलै 2022 मध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक जीएसटी करदाता म्हणून त्यांचा गौरव केला आहे.
जयंत यांचे वडील अशोक हुंबरवाडी यांनी 1974 साली उद्यमबाग बेळगाव येथे अशोक आयर्न वर्क्स ही फाउंड्री सुरू केली. सध्याच्या घडीला अशोक आयर्न ग्रुप ही संपूर्ण देशात हेवी ड्युटी एप्लीकेशन्ससाठी मशीन केलेले कास्टिंगचा सर्वाधिक पुरवठा करणारा उद्योग असून ग्रुपचा वार्षिक महसूल 1000 कोटी रुपये इतका आहे. प्रारंभी 1990 मध्ये फक्त इंजिन ब्लॉक्स कास्टिंग तयार करणारे अशोक आयर्न ग्रुप आज 16 -सिलेंडर ब्लॉकचे उत्पादन करत आहे. या ग्रुपचे बेळगावात 11 प्लांट असून जेथून जागतिक दर्जाचे विशिष्ट घटकांचे (स्पेसिफिक कंपोनंट्स) वितरण केले जाते. त्यापैकी अनेक उत्पादने निर्यात केली जातात.
अशोक आयर्न ग्रुपची मनुष्यबळ क्षमता जवळपास 4000 इतकी आहे. या ग्रुपचे जयभारत फाउंडेशन असून ज्याचा उद्देश शाश्वत समुदाय उभारणी आणि समाज हितासाठी सामाजिक प्रभाव निर्माण करणे हा आहे. हे फाउंडेशन प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य आणि समुदाय विकास या क्षेत्रात कार्यरत असते.