नागालँड येथे भारतीय कुस्ती महासंघ व चाके संघ कुस्ती संघटना नागालँड आयोजित दुसऱ्या खुल्या नागा कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत मुचंडी (ता. जि. बेळगाव) येथील मल्ल पै. अतुल शिरोळे याने उपविजेतेपदासह रौप्य पदक पटकाविले आहे.
नागालँड येथे भारतीय कुस्ती महासंघ व चाके संघ कुस्ती संघटना नागालँड यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या 5 नोव्हेंबरपर्यंत दुसऱ्या खुल्या नागा कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेच्या 90 किलो वजनी गटात मुचंडी गावच्या पै. अतुल शिरोळे यांनी द्वितीय क्रमांकसह रौप्य पदक मिळविले आहे. सदर वजनी गटात 36 पैलवानांचा सहभाग होता. पै. अतुल याने पाच कुस्त्या खेळून अंतिम फेरी गाठली.
मात्र अंतिम फेरीत त्याला मणिपूरच्या पै. विखोजो दाहो याच्याकडून पराभव पत्करावा लागला. 90 किलो वजनी गटात अतुल मागोमाग नागालँडच्या व्हिचितो सासा आणि दिल्लीच्या नितेश तोमर यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक मिळविला. अंतिम लढतीनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष निखरोलो खालो आणि नागालँड कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आखों रिंगा यांच्या हस्ते पै अतुल शिरोळे याला रौप्य पदक व प्रशस्तीपत्रसह रोख 25 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
पै. अतुल यांनी यापूर्वी जॉर्जिया व दक्षिण कोरियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. तुर्कस्तान येथील स्पर्धेतही त्यांनी चमकदार कामगिरी नोंदविली होती. कुस्ती खेळण्याबरोबरच पै. अतुल शिरोळे हे मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या खादरवाडी येथील शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत.
नागालँड येथील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांनी पै. अतुल शिरोळे यांचे खास अभिनंदन करून प्रोत्साहनार्थ आर्थिक सहाय्य केले होते. आता उपरोक्त यशाबद्दल पै. अतुल शिरोळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.