कंग्राळी खुर्द गावाजवळील अलतगा येथील क्वारीमध्ये साचलेल्या तळ्यात मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या अनगोळ येथील एका युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सतीश हनमण्णावर (वय 22, रा अनगोळ) असे क्वारीतील पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नांव आहे. सतीश हा आज मंगळवारी दुपारी आपल्या दोघा मित्रांसोबत अलतगा क्वारी परिसरात गेला होता. त्यावेळी तेथील तळ्यासदृश्य खड्ड्यातील पाण्यात तो एकटाच होण्यासाठी उतरला.
त्यावेळी त्याचे दोघे मित्र तळ्याशेजारी बाजूला बसले होते. मात्र होता येत नसतानाही खोल पाण्यात उतरण्याचे धाडस सतीशच्या जीवावर बेतले आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी लागलीच सदर घटनेची माहिती सतीशच्या नातलगांना आणि पोलिसांना दिली.
सदर घटनेची माहिती मिळतात काकती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन शोध कार्य हाती घेण्याबरोबरच अग्निशामक दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले आहे. सध्या क्वारीच्या ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या तळ्यात सतीशचा मृतदेह शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अलतगा येथील संबंधित क्वारी कांही वर्षापासून बंद आहे. त्यामुळे या पडीक क्वारीच्या ठिकाणी अलीकडच्या काळात पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या सतीश हनमण्णावर याचा मृतदेह शोधण्याचे कार्य सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरूच होते.