Thursday, January 2, 2025

/

तुम्ही अँक्शन दिली की आम्ही रिअक्शन देऊ:संजय पोवार

 belgaum

सीमाप्रश्नाच्या सोडोनुकीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ देण्यासाठी कोल्हापूर शिवसेनेतर्फे आयोजित ‘दिवस वेदनांचा दौड मशालीची’ या मशाल रॅलीला आज सोमवारी कोल्हापुरातील राजर्षी शाहू समाधी स्थळापासून प्रारंभ झाला. शेकडो शिवसैनिकांचा सहभाग असलेली ही मशाल रॅली शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पोवार आणि विजय देवणे यांच्या उपस्थितीत बेळगावच्या दिशेने निघाली आहे.

बेळगाव येथे 1 नोव्हेंबरला काळा दिन पाळला जातो यानिमित्त महाराष्ट्रातील शिवसेनेतर्फे आज सोमवारी कोल्हापूर ते बेळगाव मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळापासून जय भवानी जय शिवाजी, आवाज कोणाचा शिवसेनेचा, बेळगाव -कारवार -निपाणी -बिदर -भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडत मशाल रॅलीला प्रारंभ झाला.

याप्रसंगी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पोवार, विजय देवणे वगैरे शिवसेनेचे नेते उपस्थित होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बेळगावच्या दिशेने निघालेल्या मशाल रॅलीमध्ये शेकडो शिवसैनिकांचा सहभाग असून ही रॅली कागल, कोगनोळी, निपाणी, संकेश्वर, हत्तरगी मार्गे बेळगावला पोहोचणार आहे. रॅलीत ठीक ठिकाणी तेथील स्थानिक शिवसैनिक सहभागी होणार आहेत.

मशाल रॅली शुभारंभ प्रसंगी प्रसार माध्यमांची बोलताना शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पोवार यांनी महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या बेळगावातील प्रवेश बंदी संदर्भात बोलताना या देशात लोकशाही शिल्लक आहे का? असा प्रश्न आम्हाला पडतो असे सांगितले. सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे, प्रत्येक शिवसैनिक थोडक्यात महाराष्ट्रातील शिवसेना व मराठी माणूस सीमावासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हे आम्ही कितीही अडवणूक झाली तरी सिद्ध करून दाखवणार आहोत. ही लोकशाही असल्यामुळे आम्हाला कुठेही जाऊन भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जर भावनाच व्यक्त करण्यास विरोध होत असेल, दडपशाही केली जात असेल तर त्या दादागिरी विरुद्ध शड्डू मारण्यास आम्ही कधीही तयार आहोत. तुम्ही ॲक्शन दिलीत की आम्ही रिएक्शन देणारच. फक्त आदेश यायची फुरसत महाराष्ट्रातील कन्नड बांधवांना सळो की पळो करायचे ठरवले तर ते आम्ही करू शकतो. मात्र आम्हाला माणुसकी आहे असे सांगून आम्ही जात-पात कधी मानली नाही. परंतु सीमाभागात मराठी माणसाचा घात केला जात आहे. त्याच्या विरोधात आमचा लढा असून तो आम्ही यशस्वी करून दाखवू असेही पोवार यांनी स्पष्ट केले.Devne pawar

विजय देवणे यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना यापूर्वी दोन-तीन वेळा कोल्हापूरमधील शिवसैनिकांना बेळगावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिक पेटून उठला आहे. कर्नाटक सरकार शिवसैनिकांवर बंदी घालते यामागे फार मोठे राजकारण आहे. मराठी माणसामागे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ताकदीने उभे आहेत. बेळगावसह निपाणी, कारवार, बिदर, भालकी वगैरे सीमाभागाशी ठाकरे कुटुंबाचे आगळे नाते आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मराठी माणसांच्या मागे उभे रहा असा आदेश दिला आहे. यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

मराठी चळवळ मोठी व्हावी हा यामागचा उद्देश आहे. सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी चार पिढ्या संपल्या आहेत. त्यामुळे कितीही बंदी घातली तरी ती झुगारून आम्ही बेळगावला जाणारच असा निर्धार देवणे यांनी व्यक्त केला.या मशाल रॅलीत सहभागी होण्यासाठी बेळगाव हून शिवसैनिक कोल्हापूरला गेले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.