दिवाळी आली की कपडे, फटाके, आकाशकंदील खरेदी करायची लगबग सुरू होते. एकीकडे आई फराळ बनवायला सुरुवात करते आणि लेकरांची किल्ला बनवायची तयारी सुरु होते. शाळेला दिवाळीची सुट्टी लागली की, त्या दिवसापासूनच किल्ला कसा बनवायचा? नेमकं काय नवीन करता येईल? हे चक्र या बालमंडळींच्या डोक्यात चालू होऊ लागत. महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे. त्याला आपल्या पूर्वजांचा पराक्रमाचा वारसाही लाभलेला आहे.
पण, दिवाळीत किल्ला का बनवतात? हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा याविषयी ज्येष्ठ मंडळी एक उदाहरण देतात. ते असं सांगतात की,पुर्वीच्या काळात दळणवळणाची साधनं नव्हती. त्यामुळे गावातील काही ठरावीक लोकच गड किल्ले पाहायला जात होते. मग ते तिथुन आल्यावर दिवाळीच्या काळात लहान मुलांना त्या किल्ल्याचा इतिहास सांगत होते. त्यात किल्ल्याची बांधकाम शैली, त्यावर असणारे बुरुज त्याची माहिती गोष्टीच्या रुपात सांगायचे. मग त्यानुसार मुलं किल्ल्याची प्रतिकृती साकारतात.
किल्ला तयार केल्यामुळे मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास तर कळत होताच. किल्ला हे शौर्याच ध्येयाच प्रतिक मानल जात. दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेच बिज मनामध्ये रुजवण्यांच काम होत. शिवाय दिवाळीच्या सुट्टीत एक विरंगुळाही मिळत असे. पुढे हिच गोष्ट परंपरा बनत गेली आणि दिवाळीला किल्ला तयार करणे ही प्रथा सुरु झाली.
लहान मुलंकिल्ला तयार केल्यामुळे मुलांच्या
कल्पनाशक्तीला चालना मिळते. टाकाऊ वस्तुचा वापर योग्य पद्धतीने करुन मुले किल्ल्यावर सुबकता आणण्यासाठी प्रयत्न करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुले जेव्हा किल्ला तयार करतात तेव्हा त्यांना त्या किल्ल्याची ऐतिहासिक भौगोलिक आणि बांधकामशास्त्रांची ओळख होते. अनेक मुलं एकत्र येऊन किल्ला तयार करतात. त्यामुळे त्यांना एकीचे बळ कळते आणि मुलांच्या मनामध्ये किल्ल्याप्रती आदर निर्माण होतो. किल्ल्यांचं संरक्षण ही ही आपली जबाबदारी आहे हा विचार बालमनावर रुजवला जातो.
असाच एक अष्टविनायक नगर येळ्ळुर रोड वडगांव येथील बालचमुंनी रोहिडा किल्ला साकारला आहे.
कार्तिक गुरव, ओम बसरीकट्टी, सागर व संकेत गेंजी, स्वप्निल ,श्लोक व अंश बेळगुंदकर, क्रुस्तव व अस्मित कुगजी, सहर्ष गोरल,आयुष व अभिषेक जांगिड, साईनाथ बेली, श्रेयस व माधव गडकरी, अनिकेत चतुर यांनी हा साकारला आहे.
या किल्ल्याबद्दल या मुलांनी अशी माहिती दिली आहे की,सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहिडेश्वर’. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहिडेश्वर किल्ला हे रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. रोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहिडेश्वर किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.
या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तिसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशाहीने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. इ.स. १६६६च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून इ.स. १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहिडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहिडाचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवरायांच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली की ३०च होन का, तर राजं त्यावर म्हंटले की, जेधे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोगलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा किल्लाही भोरकरांकडे होता,
रोहिडा किल्लावर प्रवेश करण्यासाठी प्रवेश द्वारातून जावे लागते. पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. त्यानंतर पुढे दहा ते वीस पायऱ्या पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो.
या दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारे टाके बघायला मिळतात. येथून पाच- सात पायर्या चढून गेल्यावर किल्ल्याचा तिसरा दरवाजा लागतो.हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. व यावर बऱ्या प्रमाणात कोरीव काम आढळते. त्या किल्ल्याच्या दोन्ही बाजूस हत्तीचे तोंड कोरण्यात आले आहे.
किल्ल्यावर भैरवाचे मंदिर लागते. या मंदिरा समोरच लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. मंदिरात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहिडा किल्ल्याचा घेर हा लहान असल्याने हा किल्ला बघायला फारसा वेळ लागत नाही.रोहिडा किल्ल्याच्या आग्नेय दिशेला आहे शिरवले बुरुज, पश्चिमेस पाटणे बुरुज व दामगुडे बुरुज, उत्तरेस वाघ जाईचा बुरुज, आणि पूर्वेस फत्ते बुरुज व सदरेचा बुरुज असे एकूण 6 बुरुज आहेत.
रोहिडा किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत दिसते. रोहिडा किल्ल्याच्या उत्तरे कडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच मानवी मूर्ती व शिवपिंडी सुद्धा आहेत.
अशाप्रकारे बरीच अशी माहिती दिली या बालचमुनी…..
2 ऑक्टोबर पासून या मुलांनी हा किल्ला बनविण्यास सुरुवात केली होती, व 24 ऑक्टोंबर या दिवशी किल्ल्याचे उद्घाटन अष्टविनायकनगर युवक मंडळाने केले, व या उद्घाटन प्रसंगी या बालचमूनी महाप्रसादाचे देखील आयोजन केले होते ….