चवताळलेल्या मधमाशांच्या हल्ल्यात एका वयस्क सायकलस्वारासह तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज मण्णूर (ता. जि. बेळगाव) येथे घडली.
मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांपैकी सायकलस्वार इसमाचे नांव बसवंत महादेव पाटील (वय 76, रा. मणणूर) असे आहे. बसवंत यांच्यावर आज गुरुवारी सकाळी तर नवरा -बायको असलेल्या अन्य दोघाजणांवर सायंकाळी मधमाशांनी गावाजवळ हल्ला केला. या तिघांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
बसवंत पाटील हे आज सकाळी 9:30 वाजता कांही कामानिमित्त सायकलने मण्णूरहून बेळगाव शहराकडे निघाले होते. त्यावेळी गावाजवळ आंबेवाडी क्रॉस ब्रिजनजीक आकाशातून स्थलांतर करणाऱ्या मधमाशांच्या थव्यातील माशा अचानक चवताळल्या आणि त्यांनी थेट सायकल वरून जाणाऱ्या बसवंत यांच्यावर हल्ला चढविला. त्यावेळी किंचाळत रस्त्यावर कोसळलेल्या बसवंत यांच्या शरीराला मधमाशांनी असंख्य दंश केल्यामुळे ते जागीच बेशुद्ध पडले. याबाबतची माहिती मिळताच मण्णूर येथील कांही युवकांनी घटनास्थळी धाव घेतली.
बेशुद्ध अवस्थेतील बसवंत पाटील यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी रुग्णवाहिका मागविण्यात आली होती. मात्र दरम्यान सामाजिक कार्यकर्ते व ग्रामीण म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले हे त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी बसवंत यांची गंभीर अवस्था लक्षात घेऊन रुग्णवाहिकेची वाट न पाहता त्यांना स्वतःच्या कार गाडीतून तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले.
सकाळी सायकलस्वार बसवंत पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्या मधमाशा इतक्या चवताळल्या होत्या की त्यांनी आज सायंकाळी एका दाम्पत्यावर हल्ला करून त्यांना देखील जखमी केले. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना देखील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले आहे. मधमाशांच्या हल्ल्यातील तीनही जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. एकंदर चवताळलेल्या मधमाशांनी आज मण्णूर येथे जणू आपली दहशतच निर्माण केली होती.