सुळेभावी (ता. बेळगाव) येथील हादरवून सोडणाऱ्या दुहेरी खुनाच्या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांची तीन विशेष तपास पथके नियुक्त करण्यात आली असून या पथकाने त्यांच्यावर सोपविलेली कामगिरी पार पाडण्यास सुरुवात केली आहे.
बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या सुळेभावी गावात गुरुवारी रात्री घडलेल्या दुहेरी खुनामुळे संपूर्ण गाव हादरले आहे. दोन गटातील हाणामारीचे पर्यावरण दोन तरुणांच्या निर्घृण खुनात होण्यामागे पूर्ववैमनस्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे. या खून प्रकरणांचा छडा लावण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या आणि उपपोलीस प्रमुख रवींद्र गडादी यांनी तीन विशेष तपास पथकांची स्थापना केली आहे.
सदर खून प्रकरणातील फरारी मारेकर्यांना गजाआड करण्यासाठी आणि खून नेमके कशासाठी झाले? हे उघडकीस आणण्यासाठी ही तपास पथके कार्यरत झाली आहेत. दरम्यान आज शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत खून झालेल्या दोन्ही तरुणाचे मृतदेह सिविल हॉस्पिटलमधील शवागृहात उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आले होते. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह अंतिम संस्कारसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.
काल गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास सुळेभावी (ता. बेळगाव) येथील लक्ष्मी गल्ली परिसरात असलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ एक तर तिथून जवळच असणाऱ्या मारुती मंदिर समोर आणखी एक खून झाला. दोन्ही खून 50 मीटरच्या अंतरावर झाले आहेत. प्रकाश निंगाप्पा हुंकरी -पाटील (वय 24, रा. लक्ष्मी गल्ली सुळेभावी) आणि रणधीर उर्फ महेश रामचंद्र मुरारी (वय 26, रा. कलमेश्वरनगर सुळेभावी) अशी खून झालेल्या तरुणांची नावे आहेत.
या दुहेरी खुनापैकी महेश रामचंद्र मुरारी याचा खून पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. महेश मुरारी याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर आधीपासूनच खुनाची केस सुरु होती. खुनासह अनेक प्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल होते. प्रकाश हुंकरी -पाटील याच्या खुनाचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. अज्ञातांनी पाठलाग करून धारदार शस्त्राने हल्ला करून वर्मी घाव घातल्यामुळे प्रकाश व रणधीर हे जागीच ठार झाले.
सुळेभावीत अचानक घडलेल्या या खुनाच्या घटनेनंतर सर्वत्र घबराट पसरली आहे. पोलिसांच्या भीतीमुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांनी गाव सोडले असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. या खुनाच्या घटनेनंतर सुळेभावी गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून गावातील बहुतांशी ग्रामस्थांचे मोबाईल देखील बंद आहेत.
पोलीस प्रशासनाने दुहेरी खुनाच्या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून संपूर्ण गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. घटनास्थळी पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.