जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करणाऱ्या एका 80 वर्षीय वृद्ध महिलेला सहीसाठी हॉस्पिटल मधील आयसीयूमधून चक्क कार्यालयात बोलावून बेळगाव दक्षिण उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी माणुसकीला काळीमा फासल्याची संतापजनक घटना आज शनिवारी घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बेळगाव दक्षिण सब रजिस्ट्रार अर्थात उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उद्धट आणि हेकेखोरपणामुळे जीवन मरणाचा लढा देत हॉस्पिटल मधील अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) उपचार घेणाऱ्या एका वृद्ध महिलेला चक्क आयसीयूमधून कार्यालयात यावे लागले. कुटुंबीयांनी त्या वृद्ध महिलेला खाटेवरूनच उपनिबंधक कार्यालयात आणले होते.
बेळगावच्या महादेवी अगसीमनी या 80 वर्षाच्या आजीबाई प्रकृती अस्वस्थामुळे आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. मालमत्ता वाटणी आणि मालमत्ता हक्कपत्र करारावर स्वाक्षरी करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक होते. त्यासाठी महादेवी आजींची सही आणि अंगठा आवश्यक होता. आजीवर उपचार सुरू असल्यामुळे अगसीमनी कुटुंबीयांनी उप नोंदणी अधिकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये येण्याची विनंती केली होती. मात्र सब रजिस्ट्रार पद्मनाभ गुडी यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन सही करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये येऊन आजींच्या हाताचा अंगठा घेण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
आजीची अवस्था लक्षात न घेता माणुसकी सोडून या पद्धतीने पैशाची मागणी करण्यात आल्याने संतप्त अगसीमनी कुटुंबीयांनी पैसे देण्यास नकार देऊन महादेवी आजींना हॉस्पिटलच्या बेड सकट उचलून थेट उपनिबंधक कार्यालयात आणले.
या वेळचा कार्यालयामध्ये आजी खाटेवरूनच कागदपत्रांवर सही करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बेळगाव दक्षिण उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या माणुसकी शून्य कारभाराबद्दल जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.