मराठी विद्यानिकेतन बेळगावमध्ये गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून ‘ माझी झेप – विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रम’उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मराठी विद्यानिकेतन शाळेचे माजी विद्यार्थी अजय सपकाळे उपस्थित होते.
सध्याच्या युगात सर्वच क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल होत आहेत. परिवर्तन ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. करिअरच्या तर वाटा विद्यार्थ्याच्या चहूबाजूंनी पसरलेल्या आहेत. पण आपण कोणते क्षेत्र निवडावे? कलाक्षेत्रात कोणकोणत्या वाटा आपली वाट पाहत आहेत? याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी याच क्षेत्रात नावारूपाला आलेले व्यक्तिमत्व म्हणजेच मराठी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी श्री. अजय सपकाळे यांनी इयत्ता सातवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आपल्या फिल्डमधील अनेक शाखांची माहिती देत देत कलेची झेप परदेशापर्यंत कशी जाऊ शकते याची प्रचिती स्वतःच्या प्रवासातून त्यांनी दिली. फिल्म इंडस्ट्रीमध्ये ॲनिमेशन, थ्रीडी ॲनिमेशन आणि व्ही.एल.सी. याबाबत करियर करताना प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
डॉक्टर आणि इंजिनियर या फिल्ड सारखे कलेचे क्षेत्र नावाजलेले नसले तरी कलेला संधी मिळवून देणारे हे क्षेत्र नक्कीच आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सुजनात्मक विचार करून तंत्रज्ञानाचा वापर आजच्या घडीला महत्त्वाचा आहे. अशाप्रकारे संवाद साधत साधत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रत्युत्तरे देऊन, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रत्येक विद्यार्थी सभागृहातून बाहेर निघताना कलेकडे कलात्मकतेने पाहण्याची नजर घेऊनच परतला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जी.व्ही.सावंत सर, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक शबी. एम. पाटील. यांनी केले