मेसोपोटेमिया (सध्याचे इराक) येथे 1918 साली या दिवशी शहीद झालेल्या 114 मराठा रेजिमेंट (मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर) जवानांच्या स्मरणार्थ आयोजित शरकत दिन आज शनिवारी 29 ऑक्टोबर रोजी आचरणात आणण्यात आला.
शरकत दिनानिमित्त शहरातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथील शरकत युद्ध स्मारकाच्या ठिकाणी आज 1918 च्या युद्धात शहीद झालेल्या 114 मराठा रेजिमेंटच्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर ज्योदीप मुखर्जी उपस्थित होते. त्यांनी लष्करी इतमामात शरकत युद्ध स्मारकाला पुष्पचक्र वाहून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
शरकत दिनानिमित्त विशेष सैनिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात मराठा रेजिमेंटचे सर्व अधिकारी ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स, विविध श्रेणीतील जवानांसह नागरी लष्करी कर्मचारी आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
मेसोपोटेमियाच्या युद्धात 114 मराठा रेजिमेंटलच्या शहीद वीर जवानांनी अतुलनीय पराक्रम करताना असामान्य धैर्य आणि सहनशक्ती दाखवत स्वतःच्या रक्ताने अमर गाथा लिहिली आहे.
युद्धातील पराक्रमाबद्दल 114 मराठा रेजिमेंटला दोन प्रतिष्ठित सर्व्हिस ऑर्डर्स, चार मिलिटरी क्रॉस, सहा इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट, 16 विभिन्न प्रतिष्ठेची सेवा पदकं या पद्धतीने एकूण 36 शौर्य पुरस्कार मिळाले आहेत. फक्त एका युध्द मोहिमेत इतके पुरस्कार आजतागायत भारतीय लष्कराच्या इतर कोणत्याही युनिटला मिळवता आलेले नाहीत हे विशेष होय.