आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय वर्तुळात आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली असून राजकारणी मंडळींनी आतापासूनच एकमेकांवर टोलेबाजी सुरु केली आहे. बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या केपीसीसी बैठकीत आज आमदार सतीश जारकीहोळी यांनी आमदार रमेश जारकीहोळी यांना लक्ष्य करत टोलेबाजी केली.
मागील सरकार पाडणाऱ्या रमेश जारकीहोळी यांच्यासाठी हे सरकार पाडणे फार मोठी गोष्ट नाही. रमेश जारकीहोळी नाराज झाले तर ते काही करू शकतात, अशी भीती भाजप नेत्यांना वाटत आहे.
त्यामुळे भाजप त्यांना चॉकलेट खाऊ घालत आहे. भाजपने माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना नेतृत्व दिले नाही तर रमेश जारकीहोळी यांच्यासाठी वेगळा हिशोब भाजपमध्ये होऊ शकेल का? असा टोला त्यांनी लगावलाय.
पक्ष संघटन करणाऱ्या येडियुराप्पांना भाजपने बाजूला सारले आहे. त्यांना नेतृत्व देण्यात येत नाही. तर रमेश जारकीहोळी यांना कसे काय नेतृत्व मिळेल? सध्या भाजप हायकमांड बैठकीमध्ये व्यस्त आहे.
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत बैठक घेण्यासाठी भाजप हायकमांड गेले असून बेळगावमध्ये रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेही सतीश जारकीहोळी म्हणाले.