Sunday, December 22, 2024

/

सावंतवाडीचा एम्स अकादमी संघ अजिंक्य!

 belgaum

बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित पावले चषक 15 वर्षाखालील मुलांच्या आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद सावंतवाडीच्या एम्स क्रिकेट अकादमीने हस्तगत केले आहे. स्पर्धेतील मालिकावीर किताबाचा मानकरी राजर्स क्लबचा झोया काझी हा ठरला.

शहरातील फिनिक्स स्कूलच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात एम्स क्रिकेट अकॅडमी सावंतवाडी संघाने प्रतिस्पर्धी रॉजर्स क्रिकेट क्लब बेळगाव संघावर 66 धावांनी शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सावंतवाडी संघाने मर्यादित 22 षटकात 5 गडी बाद 199 धावा काढल्या.

विशेष म्हणजे कर्णधार साहिल खतीब याने 12 चौकार व 3 षटकारांसह 108 धावा काढून शतक झळकाविले. त्याला पार्थने नाबाद 22 तर ईशान कुबडे याने 18 धावा काढून सुरेख साथ दिली. रॉजर्स संघातर्फे राजने सर्वाधिक 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल रॉजर्स क्रिकेट क्लब बेळगाव संघाला मर्यादित 22 षटकात 7 बाद 133 धावाच काढता आल्या. त्यांच्या स्वरूप साळुंखे (7 चौ. 35), झोया काझी (3 चौ. 21) व केदार संभाजीचे (3 चौ. 17) यांनी संघाला विजय मिळवून देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

अंतिम सामन्यानंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे व स्पर्धेचे पुरस्कर्ते प्रकाश पावले आनंद झांजल (कोल्हापूर), प्रशांत कडोलकर, महेश कर्णिक, राहुल रेगे, विठ्ठल कुंडेकर, दिनेश गवी, महांतेश गवी, सुनील देसाई, गौस हाजी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या एम्स क्रिकेट क्लब सावंतवाडी आणि उपविजेत्या रॉजर्स क्लब बेळगाव संघाला आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक विजेते पुढील प्रमाणे आहेत. अंतिम सामन्यातील सामनावीर -साहिल खतीब (सावंतवाडी), उत्कृष्ट फलंदाज -ईशान कुबडे (सावंतवाडी), उत्कृष्ट गोलंदाज -रोहन पाटील (रॉजर्स), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक -अथर्व तोरस्कर (सावंतवाडी), उदयोन्मुख खेळाडू -केदार संभाजीचे (रॉजर्स) आणि मालिकावीर -झोया काजी (राजर्स) या सर्व खेळाडूंना चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.