खंडेनवमी आणि दसऱ्यानिमित्त खरेदीसाठी शहराच्या बाजारपेठेत सध्या नागरिकांच्या गर्दीला उधाण आले आहे. त्यामुळे ठीक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवताना दिसत आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे नवरात्रोत्सव काळात बाजारपेठा शांत होत्या. मात्र यंदा सर्व निर्बंध हटविण्यात आल्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. आज खंडेनवमी व उद्या दसरा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी झाली आहे.
खंडेनवमी आणि दसऱ्याच्या पूजेसाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी सकाळपासून बेळगाव शहरासह शहापूर बाजारात नागरिक मोठ्या संख्येने येत होते. सर्वत्र पूजेचे साहित्य, फळे, नारळ, फुले, हार आणि ऊस यांना वाढती मागणी पहावयास मिळत आहे. दसऱ्यानंतर अवघ्या काही दिवसात दिवाळी सण असल्यामुळे त्याचीही खरेदी आतापासून केली जात आहे.
दसऱ्यानिमित्त फक्त बेळगाव शहरच नाही तर तालुक्यासह चंदगड व गोवा येथील नागरिक बेळगावात खरेदीसाठी येतात. त्यामुळे सध्या बाजारपेठेतील गर्दीमध्ये अधिकच भर पडली आहे. बाजारपेठेत अनेक जण दुचाकी व चारचाकी गाड्या घेऊन जात असल्यामुळे तसेच ऑटोरिक्षांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
रस्त्यावरील गर्दीतून वाट काढताना पादचाऱ्यांसह वाहन चालकांची देखील दमछाक होत आहे. त्यामुळे रहदारी पोलिसांनी बाजारपेठेतील वाहतुकीचे नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे.