देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी खानापूर तालुक्यातील गोवा सीमेवरील मान या गावाला अद्याप रस्ता नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले.
मुख्य रस्त्यावरून गावाकडे जाणाऱ्या खराब रस्त्या बरोबर चोर्ला मार्गे बेळगाव-गोवा रस्त्याच्या दुरवस्थेच्या विरोधात माण गावातील ग्रामस्थांनी आज गुरुवारी सकाळी जांबोटी येथे रास्ता रोको आंदोलन केले.
जांबोटी, कणकुंबी व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनीही रास्ता रोकोमध्ये मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. जांबोटी येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्या मुळे या महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. वन व महसूल अधिकाऱ्यांच्या चर्चे नंतर आंदोलनकर्त्यानी रास्ता रोको मागे घेण्यात आला.
आज सकाळी जांबोटी सर्कल येथे मोठ्या संख्येने जमलेल्या गावकऱ्यांनी रस्ता रोखून धरला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
खानापूर तहसीलदार प्रवीणकुमार जैन, सीपीआय सुरेश शिंगे यांच्यासह वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कर्नाटक अबकारी चेक पोस्टपासून जंगलात असलेल्या मान गावात अधिकारी आणि स्थानिक नेत्यांची बैठक झाली.वनाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही नवीन रस्त्याला किंवा रस्त्याच्या रुंदीकरणाला वन मंजुरी देता येणार नाही.
“हे प्रकरण उच्च अधिकार्यांकडे नेऊन सोडवले जाईल जेणेकरुन गावकऱ्यांना योग्य रस्ता मिळेल आणि चोर्ला रस्ता दुरुस्तीचा विषयही मार्गी लावला जाईल,” असे आश्वासन तहसीलदार जैन यांनी दिले.