कित्तूर विकास प्राधिकरणाला 50 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून यावर्षी बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे राणी चन्नम्मा आणि संगोळ्ळी रायान्ना यांचे पुतळे उभारण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
बेळगाव जिल्हा प्रशासन पर्यटन खाते आणि कन्नड संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगलोर येथील रवींद्र कलाक्षेत्र आवारात कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कित्तूर चन्नम्माजी विजय ज्योती यात्रेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. कित्तूर उत्सवाला प्रारंभ होऊन 25 ते 30 वर्षे होत आहेत.
अधिकृत आदेश जारी करण्याद्वारे आमचे सरकार कित्तूर उत्सव राज्यस्तरावर साजरा करत आहे. बेळगाव जिल्हा पालकमंत्री असताना मी कित्तूर उत्सवासाठी जास्तीत जास्त अनुदान मंजूर करून घेण्याद्वारे तीन दिवस या उत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात केली. पूर्वी कित्तूर येथून चन्नम्मा यांचा संदेश देणारी ज्योत बेंगलोरला येत होती. आता कर्नाटकची राजधानी असणाऱ्या बेंगलोर येथून कित्तूर संस्थानाची राजधानी असलेल्या कित्तूर येथे ही ज्योती यात्रा काढण्याची प्रथा सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले.
कित्तूर येथील राजवाड्याचे जतन करण्याबरोबरच त्याच्या बाजूला त्या राजवाड्याची नवी प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कित्तूरचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याच्या दृष्टिकोनातून विविध योजना हाती घेण्यात येत आहेत कसे सांगून वीर संगोळी रायण्णा यांच्या नावाने नुकतीच एक सैनिक शाळा सुरू करण्यात आली आहे. पुढील महिन्यात या सैनिक शाळेचे उद्घाटन केले जाईल. याबरोबरच संगोळी रायण्णा यांच्या नंदगड येथील समाधी स्थळाचा देखील विकास साधला जाईल, असेही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री एमटीबी नागराज, साहित्यिका लीलादेवी आर. प्रसाद आदींसह मान्यवर मंडळी उपस्थित होती. बेंगळूर येथून निघालेल्या कित्तूर चन्नम्मा विजय ज्योतीचे राज्यभर फिरून येत्या 23 ऑक्टोबर रोजी कित्तूर येथे आगमन होणार आहे.