रामदुर्ग तालुक्यातील मुदेनूर गावात दूषित पाणी प्यायल्याने सुमारे 100 हून अधिक जण अत्यवस्थ झाले असून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 2 झाली आहे. अत्यवस्थांपैकी दहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बेळगाव आणि बागलकोट जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
शिवबा यंडीगेरी (वय 70) आणि निंगाप्पा हवाल्ली अशी मृत्युमुखी पडलेल्या गावकऱ्यांची नावे आहेत. दूषित पाणी प्यायल्याने आतापर्यंत मुदेनूर गावातील 186 लोक आजारी आहेत. यामध्ये 12 मुले आणि 8 मुली आहेत. ज्यांची प्रकृती गंभीर असून अत्यवस्थ प्रकृती असलेल्या 94 जणांना बागलकोट व बेळगाव जिल्हा रुग्णालयांसह काहींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शिवाप्पा यंडीगेरी आणि निंगाप्पा हवाल्ली यांचा सर्वतोपरी प्रयत्न करूनही उपचाराचा फायदा न होता मृत्यू झाला. दूषित पाणी प्यायलेल्या बहुतांश जणांना उलटी आणि जुलाब होण्याबरोबरच निद्रानाश झाला असून गावात सर्वत्र निरुत्साही वातावरण पसरले आहे.
गावातील शंभराहून अधिक लोक आजारी पडण्याचे कारण पिण्याच्या पाण्यात मिसळलेले सांडपाणी असल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश कोणी यांनी स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटून पिण्याच्या पाण्यात गटारीतील सांडपाणी मिसळल्यामुळे एकाच वेळी अनेक जण आजारी पडण्याची समस्या निर्माण झाल्याची बाब उघडकीस आली आहे.
सदर घटनेनंतर मुदेनूर गावात वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी पुरेशा प्रमाणात कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सध्या आठ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक नियमितपणे ग्रामस्थांच्या आरोग्याची तपासणी करत आहे.
आपत्कालीन वापरासाठी तीन रुग्णवाहिकासुद्धा गावात तैनात आहेत. दरम्यान, काल मृत्युमुखी पडलेल्या शिवाप्पा यंडीगेरी याच्या कुटुंबीयांना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या संमतीने 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.