जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण हे नव्या अर्थनीतीतील महत्वाचे टप्पे होते, मात्र यात सहकार क्षेत्राला विशेष असे स्थान नव्हते. दरम्यान सहकारी संस्थांनी सरकारी मदतीवर न विसंबता स्वतःची प्रगती स्वतः करत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, आर्थिक नीतीतील आमूलाग्र बदलांमुळे सहकार क्षेत्रातील आव्हानांना तोंड देत मोठी कसरत करावी लागली. अशातच महिला सहकारी पतसंस्थांसमोर तर अधिकच आव्हाने उभी होती. मात्र आलेल्या आव्हांना पेलत, ग्राहकांशी सौहार्दपूर्ण नाते जपत बेळगावमधील श्री राजमाता महिला बहुउद्देशीय सहकारी संस्था प्रगतीच्याच दिशेने आजवर वाटचाल करत आली आहे.
ग्राहकांशी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते जपत, महिला सक्षमीकरणासाठी हातभार लावणारी हि संस्था बेळगावमध्ये कार्यरत आहे. केवळ सहकार क्षेत्रच नाही तर सामाजिक, शैक्षणिक आणि इतरही उपक्रम हि संस्था राबविते. या संस्थेची स्थापना सहकार नेते मनोहर देसाई यांनी केली असून या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून मनोरमा देसाई तर उपाध्यक्षा म्हणून प्रतिभा नेगिनहाळ या कार्यरत आहेत. संस्थेच्या संचालिका मंडळात मालती देशपांडे, अश्विनी सावंत, नंदा मोर्डेकर, शीतल जगताप, विमला पटेल, शांता पटेल, अनुराधा देसाई, सुहासिनी पाटील, डॉ. पूजा देसाई आदींचा समावेश आहे. तर व्यवस्थापिका म्हणून सुवर्णा बिर्जे या कार्यरत आहेत.
ग्राहकांचे हीत जपणाऱ्या या संस्थेने अनेक योजना राबवत ग्राहकांसाठी आर्थिक व्यासपीठ उभे केले आहे. सवलतीच्या दरात सुलभ कर्ज वितरण, ठेवींवर आकर्षक व्याजदर, बचत खाते, चालू ठेव खाते, रिकरिंग ठेव यासारख्या अनेक योजना संस्था ग्राहकांसाठी राबवत आहे.
बहुउद्देशीय असणाऱ्या या संस्थेत अनेक प्रकारच्या योजना राबविल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित होतात. सरत्या आर्थिक वर्षात या संस्थेने २२ लाख ३ हजार इतका नफा मिळविला आहे. रुपये ३२ कोटी ७० लाख रुपयांचे खेळते भांडवल तर ५१ कोटी ८९ लाख रुपये इतकी वार्षिक उलाढाल आहे. ४३४६ सभासद संख्या असलेल्या या संस्थेत १ कोटी ३ लाख रुपयांचे भाग भांडवल आहे. २७ कोटी ६६ लाख रुपयांच्या ठेवी, १२ कोटी २२ लाख रुपयांचे कर्जवितरण, ३ कोटी ७८ लाख रुपयांचा राखीव निधी, २० कोटी ९९ लाख रुपयांची गुंतवणूक अशी संस्थेच्या प्रगतीची आकडेवारी आहे. यंदा संस्थेने ९ टक्के लाभांश जाहीर केला आहे.
संस्थेचे व्यापक व्यवहार आणि ग्राहकांचे हीत जोपासत मिळविलेली विश्वासार्हता यामुळे या संस्थेच्या ३ विविध ठिकाणी शाखाही कार्यरत आहेत. शिवाय या तीनही शाखांचे व्यवहार सर्वोत्तम आहेत. बेळगावमध्ये कित्येक वर्षांपासून सहकार क्षेत्रात महिला सहकारी संस्था म्हणून खंबीरपणे पाय रोवून, ग्राहकांची सेवा आणि विश्वासार्हता जपत सौहार्दपूर्ण नाते जपणाऱ्या या संस्थेचे, संस्थेतील संचालिका मंडळाचे आणि कर्मचाऱ्यांचेही संस्थेच्या प्रगतीत महत्वपूर्ण योगदान आहे. महिलांनी, महिलांसाठी उत्तमरीत्या चालविलेली, सहकारी क्षेत्रातील नामांकित संस्था असलेली श्री राजमाता सहकारी बहुउद्देशीय संस्थेच्या पुढील वाटचालीस बेळगाव लाईव्ह च्या शुभेच्छा!