रायचूर -बाची राज्य महामार्ग या रस्त्याच्या 21 कोटी 82 लाख रुपये खर्चाच्या रुंदीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते काल शनिवारी उत्साहात पार पडला.
रायचूर -बाची रस्ता हा महामार्ग असण्याबरोबरच बेळगाव विमानतळाकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता असून विमानतळाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुलभतेसाठी या तातडीने रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे होते.
राज्य महामार्ग खात्याच्या योजनेअंतर्गत या रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि विकासाचे काम हाती घेतले जाणार आहे, जे बेळगाव शहराच्या एससी मोटर्सपासून ते शिंदोळी क्रॉसपर्यंत अंमलात आणले जाईल. सदर रस्ता रुंदीकरण व विकास कामाचा भूमिपूजन समारंभ काल शनिवारी आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते विधीवत पूजा करून कुदळ मारण्याद्वारे रस्ता रुंदीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास राज्य महामार्ग व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक नेतेमंडळी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.