मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जमात -ई -इस्लामी हिंद (जेआयएच) बेळगावतर्फे आयोजित ‘जाणून घेऊया प्रेषित मुहम्मद’ हा कार्यक्रम नुकताच उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला
राज्यात येत्या 9 ऑक्टोबर 2022 पर्यंत ‘जाणून घेऊया प्रेषित मुहम्मद’ (लेट्स नो प्रॉफेट मुहम्मद) अभियान राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जमात -ई -इस्लामी हिंद (जेआयएच) बेळगावतर्फे एसपी ऑफीस रोड नजीकच्या शांती संदेश ट्रस्ट सभागृहात काल शुक्रवारी उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जेआयएच अध्यक्ष शाहिद मेमन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून परमपूज्य डाॅ. श्री अल्लमप्रभू स्वामीजी, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि वक्ते म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य मेहबूब अली बाळगनूर हे उपस्थित होत. त्यावेळी आपल्या भाषणात प. पू. डॉ अल्लमप्रभू स्वामीजी यांनी सदर कार्यक्रमाची प्रशंसा करून सध्या देशातील एकंदर परिस्थिती पाहता अशा कार्यक्रमांची गरज आहे. आज समाजात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत मोहम्मद पैगंबरांची शिकवण आचरणात आणणे गरजेचे असे सांगून आपले समयोचित विचार व्यक्त केले.
मालोजीराव अष्टेकर यांनी अशा कार्यक्रमांद्वारे मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीबद्दल जनजागृती केली गेली पाहिजे. मोहम्मद पैगंबर तसेच अन्य प्रेषितांबद्दल चुकीची माहिती देऊन गैरसमज पसरविले जात आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मोहम्मद पैगंबर, संत बसवेश्वर, संत तुकाराम यांच्यासारख्या प्रेषितांच्या शिकवणी आचरणात आणणे काळाची गरज बनली आहे. समाजात एकात्मता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना समाजविघातक शक्ती अडसर ठरत आहेत असे सांगून अष्टेकर यांनी जमात -ई -इस्लामी हिंदच्या कार्याचा गौरव केला. प्राचार्य मेहबूब अली बाळगनूर यांनी समयोचित विचार व्यक्त करताना लोकांना फक्त भाषणे ऐकण्यात रस नाही आहे त्यांना देशाची एकता अखंडता आणि शांतता अबाधित राखण्यासाठीचे प्रयत्न धडपड हवी आहे, असे सांगितले
अध्यक्षीय भाषणात जेआयएच बेळगावचे अध्यक्ष शाहिद मेमन यांनी समाजात शांतता राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून त्या संदर्भात आपले विचार मांडले. द्वेष दूर करण्यासाठी व्देशाचाच वापर करून उपयोग नाही. व्देशाविरुद्ध प्रेमाचा वापर करा. द्वेष हा अल्पजीवी आहे, प्रेम हे कायमस्वरूपी आणि दैवी आहे.
भारत देश हा संत, महात्मे, सुफींचा देश आहे. आपल्या देशातील बहुतांश लोक शांतता प्रेमी आहेत. शांतता आणि एकात्मता आपल्या देशाला प्रगती आणि भरभराटीकडे घेऊन जाऊ शकते असे सांगून मेमन यांनी ‘जाणून घेऊया प्रेषित मुहम्मद’ अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमास जेआयएचचे पदाधिकारी आणि सदस्यांसह सर्व थरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रस्तावित झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मुहम्मद पैगंबर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. जेआयएच बेळगावचे जिल्हा समन्वयक यासीम मकानदार यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.