महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली 1 नोव्हेंबर काळा दिनानिमित्त काढण्यात येणाऱ्या निषेधात्मक सायकल फेरीच्या मार्गाची काल रात्री समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर आज सकाळी सहाय्यक पोलीस उपायुक्त (एसीपी) नारायण बरमनी व चंद्राप्पा यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने सायकल फेरीच्या मार्गाची पाहणी केली. पाहणीअंती समितीने ठरविलेला मार्गच निश्चित करण्याबरोबर या मार्गावरील अडथळे दूर करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे नियोजित मार्गावरूनच सायकल फेरीला परवानगी मिळण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीकडून 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून निषेधात्मक सायकल फेरी काढण्यात येणार आहे. या फेरीच्या मार्गात कपात करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने काल शुक्रवारी रात्री सायकल फेरीच्या मार्गाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात समितीचे पदाधिकारी प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, महेश जुवेकर, बाबू कोले, अनिल आमरोळे आदींचा समावेश होता. पाहणी अंती परंपरागत मार्गावरूनच सायकलफेरी करण्याचा निर्धार समितीने केला आहे.
समिती पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणी नंतर आज शनिवारी सकाळी मार्केट उपविभागाचे एसीपी नारायण बरमनी आणि खडेबाजार उपविभागाचे एसीपी चंद्राप्पा यांच्या नेतृत्वाखालील पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने सायकल फेरी मार्गाचा पाहणी दौरा केला. संभाजी उद्यान येथून सकाळी 9:30 वाजता या दौऱ्याचा प्रारंभ झाला. तानाजी गल्ली, भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली, शिवाजी रोड, हेमू कलानी चौक वगैरे मार्गासह कपिलेश्वर उड्डाणपूल मार्गे शहापूर भागातील फेरीचा मार्ग महात्मा फुले रोड, बसवेश्वर सर्कल गोवावेस मार्गे मराठा मंदिरपर्यंतच्या मार्गाची एसीपी बरमनी व चंद्राप्पा यांनी पाहणी केली. यावेळी महाद्वार रोड येथील यश हॉस्पिटलनजीक सुरू असलेल्या क्रॉस सीडी वर्कच्या कामामुळे सायकल फेरीस अडथळा निर्माण होणार असल्याचे लक्षात घेऊन स्वतः एसीपी बरमनी यांनी ते काम मनपा आयुक्तांना सांगून युद्ध पातळीवर पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले.
त्याचप्रमाणे फेरीच्या मार्गावर हेमू कलानी चौकातून ताशिलदार गल्लीकडे येताना त्या ठिकाणी एक क्रॉस ड्रेनेजचे काम सुरू आहे. त्या अडथळ्यामुळे ताशिलदार गल्लीत जाता येणार नसल्यामुळे सायकल फेरी पुन्हा भांदूर गल्लीतून जाऊन उड्डाण पुला खालून पुन्हा ताशिलदार गल्लीला मिळेल अशी माहिती समिती पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिली. त्याचप्रमाणे हेमू कलानी चौक ते आंबा भुवन तेथून शिवाजी रोड मार्गे रिझ टॉकीज कोनवाळ गल्ली येथून थेट रामलिंग खिंड गल्लीतून पुन्हा हेमू कलानी चौक, भांदूर गल्ली ते उड्डाणपूल या मार्गाची माहितीही अधिकाऱ्यांना देण्यात आली.
सायकल फेरी सकाळच्या वेळी निघणार असल्यामुळे पोलीस प्रशासनाने या मार्गावरील दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना विनंती करून मार्ग फेरीसाठी खुला ठेवावा. त्याचप्रमाणे सायकल फेरीच्या मार्गावरील बांधकामाचे साहित्य हटविण्याची सूचना संबंधितांना करावी, अशी विनंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एसीपी बरमनी व चंद्रप्पा यांना केली.
या दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत मध्यवर्तीय म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर खजिनदार प्रकाश मरगाळे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक माजी एपीएमसी सदस्य महेश जुवेकर आदिंसह खडे बाजार पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर शहापूरचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार आणि रहदारी विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांचा पाहणी दौऱ्यात सहभाग होता.