बेळगाव शहरातील महापालिकेच्या मालकीच्या विविध व्यापारी संकुलातील 46 गाळेधारकांना काल सोमवारी नोटीस बजावण्यात आली असून दुकान गाळे सोडण्यासाठी त्यांना 5 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
महापालिकेने नोटीस बजावलेल्या गाळेधारकांमध्ये जुना धारवाड रोडवरील संकुल, सीबीटी कॉम्प्लेक्स, माळ मारुती, चावी मार्केट व गणपत गल्ली येथील गाळेधारकांचा समावेश आहे. या गाळेधारकांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात महापालिकेकडून 46 दुकान गाळ्यांसाठी आयोजित लिलाव प्रक्रियेला आव्हान दिले होते.
त्यामुळे लिलाव प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. तथापि गेल्या 21 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने सर्व सहा याचिका रद्दबातल ठरविल्या. तसेच संबंधित गाळेधारकांना दुकान गाळे सोडण्यासाठी मुदत द्यावी, त्यानंतर त्या गाड्यांचा लिलाव करावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार महापालिकेच्या मार्केट विभागाकडून संबंधित गाळेधारकांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नोटीस मिळाल्यानंतर पुढील पाच दिवसात त्यांना दुकानगाळे सोडावे लागणार आहेत. सध्याच्या भाडेकरूंनी दुकान गाळे सोडल्यानंतर महापालिकेकडून रीतसर त्यांचा ताबा घेतला जाईल. त्यानंतर या गाळ्यांचा लिलाव करून नवे भाडेकरू नियुक्त केले जातील.
दरम्यान, महापालिकेने 2010 साली जुन्या भाडेकरुंनाच 12 वर्षांची मुदत दिली होती. आता मुदत संपली तरी संबंधित भाडेकरूंना तेच गाळे हवे आहेत. मनपाच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन व राईट टू रिफ्युजल या नियमाचा आधार घेऊन त्यांना पुन्हा ते गाळे मिळवता येणार आहेत.