गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास सुळेभावी येथे झालेल्या दोन खुनानंतर संपूर्ण बेळगाव हादरले असून वरचेवर घडत चाललेल्या अशा घटनांमुळे पोलीस विभागावर जनता ताशेरे ओढत आहे.
बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे रहात असून याची दखल घेत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.
गुरुवारी सुळेभावी येथील खून प्रकरणानंतर संपूर्ण गावातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. यादरम्यान कर्तव्यात कसूर करणाऱ्या, गावात येणाऱ्या जाणाऱ्यांची माहिती योग्य न हाताळणाऱ्या मारिहाळ पोलीस स्थानकातील दोन हेड कॉन्स्टेबलच्या निलंबनाचे आदेश शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिले आहेत.
सुळेभावी येथे रणधीर महेश इलियास रामचंद्र मुरारी (२६) आणि प्रकाश निंगाप्पा हुंकारी पाटील (२४) या तरुणांचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता.
यातील एकाचा खून पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली असून याप्रकरणी ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.दरम्यान सुळेभावी गावात अद्याप तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.