बेळगाव शहराच्या चारी बाजूनी असलेल्या सुपीक जमिनी बळकावून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याच्या शासनाच्या घाटाला उधळून लावुया यासाठी त्या जमीन संपादन विरोधात मुतगा परिसरातून शेकडो तक्रारी हरकती दाखल केल्या जातील असा इशारा माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांनी दिला
मंगळवारी मुतगा येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या उपस्थितीत माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांच्या पुढाकाराने मुतगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गावकरी नागरिक, कार्यकर्ते यांची बैठक झाली या बैठकीत बोलताना अष्टेकर यांनी हा इशारा दिला आहे.
1नोव्हेंबर 1956 साली बेळगाव सह मराठी बहुल भाग केंद्र सरकारने केलेल्या अन्यायकारक भाषावार प्रांत रचनेत तत्कालीन मैसूर राज्यात सामील करण्यात आला होता त्या विरोधात बेळगावातील मराठी भाषिक 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळतात काळ्या दिनाच्या फेरीत देखील शेकडोंच्या संख्येनी सहभागी होण्याचा निर्धार देखील मुतगा ग्रामस्थांनी केला.
राज्य सरकारने रिंगरोडचा प्रस्ताव आणून बेळगावच्या मराठी भाषिकांच्या नावाने असलेला सातबारा कोरा करून, बेळगांवकरांचे बेळगांव वरचे मालकीपत्र काढून घेत मराठी जनतेचे वर्चस्व कमी करण्याचा घाट घातला आहे सरकारने घातलेला हा नवा-घाट या विरोधात जनजागृती करून एकत्रित महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भगव्याखाली एकसंघ राहून उठाव करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर,माजी महापौर शिवाजी सुंठकर,वकील सुधीर चव्हाण, वकिल श्याम पाटील,समितीचे सचिव एम जी पाटील,आंबेवाडी ग्राम पंचायत अध्यक्ष चेतन पाटील आदी उपस्थित होते.कलखांब मुचंडी परिसरातील शेतकऱ्यांनी देखील बैठकीला हजेरी लावली होती.