बेळगावमध्ये निर्माण करण्यात आलेली शिवसृष्टी अद्याप उद्घाटनाशिवाय रखडली असून छत्रपती शिवाजी उद्यान परिसरात निर्माण करण्यात आलेल्या शिवसृष्टीची दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात आज श्रीराम सेना हिंदुस्थानची बैठक संघटनेचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती.
शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शहापूर येथील जुन्या पीबी रोड वरील जयशंकर भवन येथे झालेल्या बैठकीत शिवसृष्टी खुली करण्यासंदर्भात चर्चा झाली. बेळगावमध्ये निर्माण करण्यात आलेल्या शिवसृष्टीचे उद्घाटन अद्याप रखडले आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने निर्माण करण्यात आलेली शिवसृष्टी अद्याप नागरिकांसाठी खुली करण्यात आली नसून याठिकाणी असलेल्या मूर्ती आणि इतर साहित्याची दुरवस्था झाली आहे.
अलीकडे याच्या प्रमुख कमानीवर असलेला भगव्या ध्वज देखील जीर्ण झाला होता. हि बाब लक्षात घेऊन श्रीराम सेने हिंदुस्तानच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सदर ध्वज बदलला. यावेळी सदर शिवसृष्टी १६ ऑक्टोबर पर्यंत नागरिकांसाठी खुली करण्याची सूचना करण्यात आली होती. १६ ऑक्टोबर पर्यंत अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र अद्याप शिवसृष्टी खुली करण्यासंदर्भात हालचाली दिसून येत नसल्यामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली असून मतांचा जोगवा मागण्यासाठी येणाऱ्या आणि मराठी मतांवर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी येत्या १६ ऑक्टोबर पर्यंत शिवसृष्टी खुली करण्यात यावी, अन्यथा १६ ऑक्टोबर नंतर श्रीरामसेना कार्यकर्ते आणि समस्त शिवप्रेमी स्वतः शिवसृष्टीचे दरवाजे उघडतील असा इशारा रमाकांत कोंडुसकर यांनी दिला.
बेळगावमधील मराठी माणसाच्या मतांचा जोगवा मागणाऱ्या आणि मराठी माणसाकडे पाठ फिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींना येत्या चार महिन्यात आपली ताकद दाखवून देऊ असा इशाराही या बैठकीत देण्यात आला. मराठी तरुणांवर, तसेच संघटनेच्या कार्यकर्त्यांवर खोट्या तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन पोलीस श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्यांवर दडपशाहीचे अस्त्र उगारत आहेत.शहापूर मधील स्वागत कमान काढण्यास दबाव टाकून काहींनी कोती मनोवृत्ती दाखवली असल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.
निवडणुका जवळ आल्या की मराठी मतांची भीक मागणारे आणि निवडणुका झाल्यानंतर मराठी माणसावर दबावशाही करणाऱ्या लोकप्रतिनिधींना चांगलाच धडा शिकवू, हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्यांना चोख प्रत्त्युत्तर देऊ असा इशाराही या बैठकीत देण्यात आला.
कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात येत असलेल्या खोट्या तक्रारी बंद करून हिम्मत असेल तर माझ्यावर तक्रार दाखल करा, असे जाहीर आव्हान रमाकांत कोंडुसकर यांनी दिले.