नव्या सीबीटी स्थानकात मराठी फलक लावण्याची मागणी-नूतनीकरण करण्यात आलेल्या बेळगाव मध्यवर्तीय बस स्थानकाच्या (सीबीटी)ठिकाणी फलाटांवरील फलकांवरील गावांची नावे कन्नड आणि इंग्रजी बरोबर मराठीतूनही लिहावीत अशी जोरदार मागणी केली जात आहे.
नूतनीकरण करण्यात आलेल्या सीबीटी बस स्थानकाच्या ठिकाणी गावांच्या नावाच्या पाट्या फक्त कन्नड आणि इंग्रजीमध्ये छापलेल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषिक असलेल्या लोकांची मोठी तारांबळ उडत आहे.
त्या ठिकाणी कित्येक लोक बेळगाव तालुक्यातील खेड्यापाड्यातून येत असतात. यापैकी बहुतांश लोकांना इंग्रजी आणि कन्नड वाचता येत नाही. चुकीच्या जागी थांबल्यामुळे बसेससाठी त्यांना खूप वेळ ताटकळत उभे राहावे लागते.
परिणामी त्यानंतर आपली बस पकडण्यासाठी त्यांची धावाधाव होऊन तारांबळ उडते. फलका वरील गावाचे नांव वाचता न आल्यामुळे घरी जायच्या घाईत अंदाजाने थांबलेल्या प्रवाशांना बस चुकल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो.
एकंदर फक्त कन्नड व इंग्रजी असलेल्या पाट्यांमुळे ग्रामीण भागातील लोकांची मोठी गैरसोय होत आहे. बेळगाव शहर आणि तालुक्यामध्ये मराठी लोकांचे प्राबल्य अधिक आहे.
तेंव्हा याची दखल घेऊन सीबीटी बस स्थानकाच्या ठिकाणी मराठी नावाच्या पाट्या सुद्धा लावाव्यात अशी मागणी प्रवासीवर्गाकडून केली जात आहे.