पतंगाच्या धारदार मांजामुळे घडणाऱ्या दुर्घटना आणि काल झालेला एका चिमुरड्या बालकाचा मृत्यू याची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने बेळगाव शहरात पतंगाचा मांजा तयार करणे तसेच त्याची विक्री व खरेदी यावर बंदी घातली आहे.
पतंगाच्या मांजाच्या विरोधात पोलीस प्रशासनाने आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे वरील प्रमाणे बंदी जाहीर केली आहे. पतंगाचा मांजा शहरातील दुचाकी वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत असून त्यामुळे दुर्घटना घडत आहेत.
तेंव्हा बेळगाव शहरातील नागरिकांनी आपली मुले पतंग उडवण्यासाठी मांजाचा वापर करत नाहीत ना? याकडे लक्ष द्यावे. शहरात मांजा तयार करणाऱ्यांसह त्याची विक्री करणारे आणि खरेदी करणारे अशा सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल.
असे प्रकार कोठे आढळल्यास नागरिकांनी 112 क्रमांक वर अथवा नजीकच्या पोलिस स्थानकात माहिती द्यावी, असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.