बेळगाव रेल्वे स्थानकानजीकच्या पोस्टमन सर्कल आणि त्या शेजारील पोस्ट ऑफिस येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे अत्यंत दुरवस्था आहे. अपघाताला आमंत्रण देणाऱ्या या रस्त्यावरून ये -जा करणे त्रासाचे झाल्याने वाहन चालकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सर्व प्रकारचे संदेश लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या पोस्टमनसाठी समर्पित बेळगावातील पोस्टमन सर्कल हे बहुदा देशातील एकमेव असावे. तथापि सध्या या सर्कलच्या आणि जवळच असलेल्या पोस्ट ऑफिसच्या परिसरातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात खड्डे पडून दुरवस्था झाली आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये दररोज शेकडो नागरिक येत असतात. त्याचप्रमाणे संबंधित रस्त्यावर आपली वाहने घेऊन शहरात जाणारे नागरिक तसेच रेल्वे व बस स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांसह शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या सर्वांना खराब रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्यावरील कांही खड्डे अपघाताला निमंत्रण देण्याइतपत धोकादायक बनले आहेत.
त्यामुळे विशेष करून दुचाकी वाहन चालकांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागते. गेल्या कित्येक महिन्यांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या व्याप्तीत येणाऱ्या या रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्यामुळे दिवसेंदिवस या रस्त्याची वाताहत होत चालली आहे.
सध्या तिसऱ्या रेल्वे गेट येथील नव्या उड्डाण पुलाच्या रस्त्यावरील खड्डे चर्चेत असले तरी त्याहून अधिक लक्ष पोस्टमन सर्कल येथील रस्त्यावरील खड्ड्यांकडे देण्याची गरज निर्माण झाली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड हे खासदार मंगला अंगडी यांच्या अखत्यारितील असल्यामुळे त्यांनी तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे. एकेकाळी स्वच्छ, खड्डे विरहित, रहदारीस अत्यंत सुकर असे रस्ते म्हणून कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्त्यांचा नावलौकिक होता.
मात्र आता दुर्दशेच्या बाबतीत कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्ते शहरातील रस्त्यांशी स्पर्धा करू लागले की काय असे वाटू लागले आहे. ही खरंतर दुर्दैवाची बाब आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळ न दवडता सर्वप्रथम पोस्टमन सर्कल येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणीही केली जात आहे.